वॉशिंग्टन : टिकटॉकचे सीईओ शॉ जी च्यू यांनी अमेरिकी काँग्रेससमोर सुरक्षेच्या वाढत्या चिंता आणि कंपनीवर चीन सरकारच्या संभाव्य प्रभावावर उत्तरे दिली आहेत. टिकटॉकच्या सीईओला अमेरिकन समितीसमोर विविध प्रश्नांचा सामना करावा लागला. यावेळी त्यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. या दरम्यान त्यांनी सांगितले की, चिनी तंत्रज्ञान कंपनी 'बाइट डान्स' च्या मालकीच्या टिकटॉक अॅपने असा कोणताही डेटा चीन सरकारसोबत शेअर केला नाही, ज्यामुळे कोणताही सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे टिक टॉकचे अमेरिकेत 150 दशलक्ष वापरकर्ते आहेत.
भारतातील बंदीचा उल्लेख : सिनेट खासदार डेबी लेस्को यांनी त्यांच्या प्रश्नावर भारत आणि इतर देशांचा हवाला दिला आहे. त्या म्हणाल्या की, भारतासह इतर काही देशांमध्ये टिकटॉकवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बंदी घालण्यात आली आहे. लेस्को यांनी म्हटले की, 'टिकटॉक हे एक साधन आहे जे शेवटी चीन सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. या प्रकरणी संबंधित देश आणि अमेरिकेचे एफबीआय संचालक चुकीचे कसे असू शकतात? टिकटॉकच्या सीईओने मात्र हे आरोप बाजूला सारले आणि म्हटले की, हे आरोप काल्पनिक आहेत. मला यात कोणताही पुरावा दिसला नाही. यावेळी खासदार डेबी लेस्को यांनी पुन्हा एकदा भारताने घातलेल्या बंदीवर जोर दिला. त्यांनी सांगितले की, भारताने 2020 मध्ये टिक टॉकवर बंदी घातली होती.