नवी दिल्ली :सुर्याच्या अतिनिल किरणांपासून ओजोनचे थर मानवाचा बचाव करतात. मात्र जंगलात लागणाऱ्या वणव्यामुळे ओझोनच्या थरालाच धोका निर्माण झाला असून त्याचा मोठा फटका पृथ्वीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जंगलात लागलेल्या वणव्यामुळे ओझोनच्या थराची पुनर्निमिती मंदावल्याचे अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
ब्लॅक समर मेगाफायरच्या धुरामुळे ओझोनच्या थराला हानी :पूर्व ऑस्ट्रेलियातील ब्लॅक समर मेगाफायरच्या धुरावर या संशोधकांनी आपले लक्ष केंद्रित केले. हा वणवा डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत जळत होता. हा वणवा पूर्व ऑस्ट्रेलियातील सगळ्यात विनाशकारी आग असल्याचे स्पष्ट झाले होते. या वणव्यात लाखो एकर शेती जळून खाक झाली. त्यामुळे वातावरणात दहा लाख टन पेक्षा जास्त धूर जमा झाल्याचा दावा मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या संशोधकांनी आहे. याबाबतचे संशोधन या संशोधकांनी नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित केले आहे. धुराचे हे कण ओझोन थर नष्ट करणाऱ्या रासायनिक अभिक्रियांना चालना देऊ शकतात असा दावाही या संशोधकांनी केला आहे.
जंगलातील धुराच्या कणांमुळे ओझोनचा ऱ्हास :पूर्व ऑस्ट्रेलियात लागलेल्या वणव्यामुळे संशोधकांनी नवीन रासायनिक अभिक्रिया स्पष्ट केली आहे. त्यामध्ये या संशोधकांनी ऑस्ट्रेलियन जंगलातील धुराच्या कणांमुळे ओझोनचा ऱ्हास झाल्याचे स्पष्ट केले आहे. आगीमुळे दक्षिण गोलार्धातील मध्य-अक्षांशांवर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही परिसरांमध्ये एकूण ओझोनच्या 3 ते 5 टक्के ओझोन कमी झाल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. संशोधकांच्या या मॉडेलमुळे ध्रुवीय प्रदेशात आगीच्या प्रभावामुळे अंटार्क्टिकावरील ओझोनला मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे स्पष्ट करत आहे.
ओझोनचे छिद्र 2.5 दशलक्ष चौरस किमीने रुंद :ऑस्ट्रेलियन वणव्यातील धुरामुळे अंटार्क्टिक ओझोनचे छिद्र 2.5 दशलक्ष चौरस किलोमीटरने रुंद केल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या हानीत 10 टक्के वाढ झाल्याचा दावाही या संशोधकांनी केला. ओझोन पुनर्प्राप्तीवर जंगलातील आगींचा दीर्घकालीन परिणाम काय होईल हे स्पष्ट नसल्याचेही त्यांनी यावळी सांगितले. युनायटेड नेशन्सने अलीकडेच ओझोन छिद्र आणि ओझोनची हानी जगभरासाठी धोक्याची घंटा असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळेच ओझोनला हानी पोहोचवणारी रसायने टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातलीवर प्रयत्न करण्यात येत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
हेही वाचा - Water On Earth : सूर्यापेक्षाही जुने असू शकतात पृथ्वी आणि पाणी...