हैदराबाद :एकेकाळी नोकिया या मोबाईल कंपनीने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र बाजारात अनेक मोबाईल कंपन्यांनी बस्तान बसवल्यानंतर नोकिया फोन काहीसे मागे पडल्याचे दिसून आले. आता मात्र कंपनीने पुन्हा आपला जलवा दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. नोकिया कंपनीने त्यासाठी गेल्या ६० वर्षाचा आपला जुना लोगो बदलला आहे. कंपनीने याबाबतची नुकतीच घोषणा केली.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये नोकियाची क्रेझ : नोकिया कंपनीने सुरुवातीच्या काळात मोबाईल उत्पादनात आपला चांगलाच ठसा उमटवला होता. नोकिया ११०० पासून ते अनेक स्मार्टफोन नोकियाने ग्राहकांना पुरवले आहेत. सर्वसामान्य भारतीयांना नोकियाचे किफायतशीर फोन घेता येत होते. त्यामुळे नोकिया कंपनी घराघरात पोहोचली होती. मात्र त्यानंतर बाजारात अनेक कंपन्यांनी बस्तान बसवले. बाजारातील स्पर्धेत नोकिया कंपनीची काहीसी पिछेहाट झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र आता पुन्हा नोकिया कंपनी विविध क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे कंपनी पुन्हा नव्या उत्पादनाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षीत करण्यास सज्ज झाली आहे.
काय आहे कंपनीचा आगामी प्लॅन : नोकीया कंपनीने भारतीय ग्राहकांना आकर्षीत केले होते. मात्र आता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेक्का लुंडमार्क यांनी रविवारी मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना कंपनी आता आपला व्यावसाईक फोकस बदलत असल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या ६० वर्षापासून असलेला कंपनीचा लोगो आता बदलला जात असल्याचे त्यांनी सांगितले. नोकिया कंपनीचा जुना लोगो हा ग्राहकांशी जोडला गेला होता. मात्र आता कंपनीची इमेज बदलण्यासाठी नवा लोगो गरजेचा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.