वॉशिंगटन : मार्क झुकेरबर्गने मेटाची सुत्रे हाती घेतल्यानंतर मेटाने मागील वर्षी आपल्या ११ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. आता पुन्हा एकदा मेटा आपल्या १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याची घोषणा कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये केली आहे. या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार असल्याच्या वृत्ताची मार्क झुकेरबर्ग यांनी देखील पुष्टी केली आहे. एप्रिलमध्ये या कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर नवीन भरती सुरू करण्यात येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीने पाठवला कर्मचाऱ्यांना ईमेल :मेटाने आपल्या १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्याबाबतचा ईमेल पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंपनी आगामी एप्रिल महिन्यात याबाबतची कार्यवाही पूर्ण करणार आहे. त्यानंतर कंपनी वर्षभर कर्मचारी काढण्याची प्रक्रिया राबवणार असल्याचेही कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केले आहे. कंपनीने रिकाम्या असलेल्या ५ हजार जागांवरही अद्याप कोणतीही भरती केली नाही. त्यामुळे ती भरतीही करण्यात येणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे कंपनीने आपल्या आणखी १० हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्याने आता कंपनीचे काम चांगलेच बाधित होणार असल्याचेही बोलले जात आहे.