हैदराबाद Aditya L1 mission :सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली अंतराळ मोहीम आदित्य एल 1 नं शुक्रवारी पहाटे चौथ्या कक्षेत प्रवेश केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) ही माहिती दिली आहे. स्पेस एजन्सीनं 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'पृथ्वी कक्षा बदलण्याची प्रक्रिया (EBN-4) यशस्वीरित्या पार पडली. मिशन दरम्यान इस्रोच्या मॉरिशस, बेंगळुरू, SDSC-SHAR आणि पोर्ट ब्लेअर येथील 'ग्राउंड स्टेशन्स' यांनी उपग्रहाचं निरीक्षण केलं.
कक्षा बदल आता 19 सप्टेंबर रोजी होईल : इस्रोनं सांगितलं की 'पुढील कक्षा बदल 19 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता होईल.' आदित्य-L1 ही पहिली भारतीय अंतराळ-आधारित प्रयोगशाळा आहे जी पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या पहिल्या सूर्य-पृथ्वी Lagrangian पॉइंट (L1)भोवती प्रभामंडल कक्षेतून सूर्याचा अभ्यास करणार आहे. पृथ्वीच्या कक्षेतील बदलाची पहिली, दुसरी आणि तिसरी प्रक्रिया अनुक्रमे 3, 5 आणि 10 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या पार पडली.
16 दिवसांचा प्रवास: आदित्य-L1च्या पृथ्वीभोवती 16 दिवसांच्या प्रवासादरम्यान ही प्रक्रिया पूर्ण होत असते. यादरम्यान आदित्य-L1 त्याच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक गती प्राप्त करते. आता या चौथ्या कक्षेतील भ्रमण पूर्ण झाल्यावर आदित्य-L1 ला पृथ्वीच्या कक्षेतून निरोप देण्याची वेळ येईल. त्यावेळी आदित्य-L1 पुढे ट्रान्स-लॅग्रांगियन 1 इन्सर्ट ऑर्बिटल इन्सर्शन प्रक्रियेतून जाईल. म्हणजेच अंतराळात ही प्रयोगशाळा विशिष्ठ बिंदूवर स्थिरावेल.