नवी दिल्ली :पर्यावरण संरक्षणासाठी भारताने इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) बनवण्यास चालना दिली आहे. त्याचवेळी देशात मोठ्या प्रमाणात लिथियमचा साठा सापडल्याने इलेक्ट्रिक व्हेईकलच्या बॅटरी निर्मितीच्या क्षेत्रात भारताची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेच्या (CEEW) नुसार, देशाला 50 जीडब्लूएचच्या लिथियम-आयओएन बॅटरी उत्पादन संयंत्रांच्या स्थापनेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 33,750 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. 2030 पर्यंत भारताचे लिथियम बॅटरी उत्पादन 70-100 जीडब्लूएच असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
काश्मीरमध्ये सापडला लिथियमचा साठा :जम्मू आणि काश्मीरमध्ये 5.9 दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला आहे. हा साठा जर पूर्णपणे काढला तर बॅटरी-ग्रेड लिथियममध्ये रूपांतरित करण्यास चालना मिळेल. त्यामुळे 6 टीडब्लूएचपर्यंत बॅटरी उत्पादनास मदत होऊ शकते. त्यामुळे भारताला बॅटरी उत्पादन करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मदत होईल अशी माहिती लॉग 9 मटेरियलचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अक्षय सिंघल यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिली आहे.
लिथियम हा हलका, प्रतिक्रियाशील धातू :लिथियम हा एक हलका आणि प्रतिक्रियाशील धातू आहे. तो मुख्यतः ऑक्साईड आणि कार्बोनेटच्या स्वरूपात इतर सामग्रीसह एकत्रमध्ये आढळतो. मात्र कच्च्या लिथियमचे बॅटरी श्रेणीतील लिथियममध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया देशात होणे गरजेचे आहे. त्यापैकी काही रसायने भारतात अस्तित्वात नसल्याने भारताला इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. ही संपूर्ण पुरवठा साखळी देशातच ठेवण्यासाठी साहित्याची जुळवाजुळव करत विज्ञानाची प्रगती होणे आवश्यक असल्याचे मतही तज्ज्ञ व्यक्त करतात.