कोलकाता - खगोलीय घटनांमध्ये रस असणाऱ्यांसाठी सोमवारची ( ता. 21.12.2020) सायंकाळ अविस्मरणीय अनुभव देणारी ठरली. सूर्यमालेतील दोन ग्रह गुरू आणि शनी एकमेकांच्या खूप जवळ आले होते. या युतीत सूर्यमालेतील (सोलार सिस्टम) सर्वात मोठा ग्रह गुरू हा चकाकणाऱ्या ताऱ्यासारखा दिसत होता. गुरूसमोर शनीचे तेज मात्र काहीसे झाकोळले गेले. खगोलीय भाषेत या घटनेला 'ग्रेट कन्जक्शन' म्हटले जाते.
एम. पी. बिर्ला प्लॅनेटोरियमचे संचालक डी. पी. दुआरी यांनी या घटनेवर अधिक माहिती देताना सांगितले, की सन् 1623 (खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जीवनकाळ) नंतर हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या इतक्या जवळ कधीच आले नाही. दुआरी म्हणाले, की जेव्हा पृथ्वीवरुन बघताना दोन खगोलीय पिंड एकमेकांच्या खूप जवळ दिसतात तेव्हा त्याला युती म्हणतात. गुरू-शनीची अशी युती हा योग अतिदुर्मीळ असून जीवनकाळात एकदाच अशी घटना घडते. पुढे बोलताना दुआरी यांनी सांगितले, आमच्या दृष्टीकोनातून सांगायचे झाल्यास या दोन्ही ग्रहांमधील अंतर केवळ 0.1 अंश (डिग्री) आहे किंवा आपण असेही म्हणू शकतो, की दोन्ही ग्रहांमधील अंतर हे चंद्राच्या व्यासापेक्षा पाच पटींनी कमी आहे.