नवी दिल्ली : सध्या टेक जगतात चॅट जीपीटीची चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता गुगलनेही आपल्या बार्ड नावाच्या एआय चॅटबोटला प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. मात्र बार्ड चॅटबोटला प्रशिक्षण देण्यासाठी गुगल चॅट जीपीटीची कॉपी करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. या आरोपाला गुगलने फेटाळले आहे. ओपन एआयच्या ( Open AI ) च्या यशाने गुगलच्या अल्फाबेट ( Alphabet ) मधील दोन एआय संशोधन संस्थांना एकत्र काम करण्यासाठी भाग पाडल्याचा दावा द इन्फॉर्मेशनमधील अहवालात करण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी विकसित केले सॉफ्टवेअर :ओपन एआयने मिळवलेल्या यशामुळे अनेक वाद वाढत आहेत. त्यामुळे गुगलही ओपन एआयसोबत स्पर्धा करण्यासाठी बार्ड हे एआय विकसित करत आहे. गुगलच्या एआय समूहातील सॉफ्टवेअर अभियंते ओपन एआयसोबत स्पर्धा करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी काम करत आहेत. दीपमाईंड या कंपनीतील कर्मचाऱ्यांचाही यात समावेश असून ती अल्फाबेटमधील एक कंपनी आहे. गुगलने बार्ड तयार करताना अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे. त्यामुळे अडखळल्यानंतर ओपन एआयच्या चॅटबोटशी स्पर्धा करण्यासाठी गुगलकडून संयुक्त प्रयत्न सुरू झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.