हैदराबाद( तेलंगणा): आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये मायक्रोसॉफ्टने आणलेल्या चॅटबॉटला टक्कर देत गुगलने आता आपली नवीन सेवा आणण्याची घोषणा केली आहे. गुगलने 'गुगल बार्ड' नावाने नवीन चॅटबॉट आणला असून, गुगल सर्चमध्येच ही सुविधा सर्वांना उपलब्ध होणार असल्याची घोषणा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये केली आहे. गुगलच्या या घोषणेमुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रांतील स्पर्धा अधिकच तीव्र होणार आहे.
काय आहे गुगल बार्ड?: गुगल नव्याने सुरु करत असलेले गुगल बार्ड हे LaMDA आणि Google च्या स्वतःच्या संभाषणात्मक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चॅटबॉटवर आधारित आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगल बार्डला प्रायोगिक संभाषणात्मक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेवा असे म्हटले आहे. Google येत्या आठवड्यात सर्व लोकांसाठी अधिक व्यापकपणे ही गुगल बार्डची सेवा उपलब्ध करून देणार असल्याचेही पिचाई यांनी सांगितले आहे.
गुगल बार्डचा वापर कसा करायचा?:गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केलेल्या ब्लॉग पोस्टनुसार सध्या, Google Bard सर्व लोकांना चाचणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. परंतु निवडक वापरकर्त्यांना टेस्टिंगसाठी याचा वापर करता येत आहे. Google लवकरच LAMDA ची लाइटवेट मॉडेल आवृत्ती जारी करणार आहे. या सुविधेसाठी कॉम्प्युटरची पॉवर अत्यंत कमी लागणार आहे. या लाइटवेट मॉडेल आवृत्तीत या सुविधेचा वापर करणारे गुगलला त्यांचे फीडबॅक देऊ शकतील.