गॅजेट डेस्क - अनेकदा आपल्याला स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. एका ठराविक बजेटमध्ये उत्कृष्ट आणि अधिकाधिक सोयी असणारा फोन मिळावा यासाठी आपला सर्व खटाटोप असतो. मग सुरू होते धडपड असा फोन शोधण्याची, ऑनलाइनपासून तर बाजारातील सर्व दुकाने आपण पिंजून काढतो. पूर्णपणे खात्री केल्यानंतर आपल्या ग्रुपमधील एखाद्या टेक्नोसेव्ही मित्राला किंवा मैत्रिणीला सोबत घेऊन शेवटी नवा स्मार्टफोन खरेदी करण्यात येतो.
अनेकदा फोन खरेदी करताना काही विशिष्ट तांत्रिक बाबी असतात ज्या नॉन-टेक्निकल व्यक्तींसाठी नेहमी रॉकेट सायन्स असतात. मग अशी व्यक्ती मला नाही कळत त्यातले म्हणून हात झटकतात. पण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देऊ, ज्यामुळे तुम्हाला मोबाईलचे काही अवघड शब्द समजायला जड जाणार नाहीत. प्रोसेसर, कोर हे शब्द ऐकताच अनेकांचं डोकं ब्लॅन्क होतं. त्यामुळे हे शब्द सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
चला तर आज जाणून घेऊ प्रोसेसर आणि कोर म्हणजे काय?
स्मार्टफोन एक प्रकारचा संगणक आहे. ज्याप्रकारे संगणकात प्रोसेसर (Processor) फिट असते त्याचप्रकारे स्मार्टफोनमध्येही प्रोसेसर असते. मोबाईल खरेदी करताना हमखास कानावर पडणारा शब्द म्हणजे यामध्ये अमुक प्रकारचे प्रोसेसर आहे. ज्यामुळे मोबाईलची स्पीड उत्तम राहणार, वगैरे वगैरे. अशावेळेस अनेकजण याचा अर्थ कळत नसतानाही केवळ मान हलवतात आणि दुकानदारांनी वापरलेल्या या वजनदार शब्दांना बळी पडून मोबाईल खरेदी करतात.
बाजारात आता ड्युअल-कोर, ऑक्टाकोर युक्त फोन लाँच झाले आहेत. पूर्वीच प्रोसेसर काय असते यावरून डोके खाजवणारे आता कोर काय नवीन भानगड आहे यामुळे बुचकाळ्यात पडतात. पण मुळीच गोंधळण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला सांगू की प्रोसेसर म्हणजे काय आणि ते नेमके कसे काम करते.
कोर (CORE) हे सीपीयू (सोप्या भाषेत सीपीयू म्हणजे संगणकाचे ब्रेन) म्हणजेच प्रोसेसरच्या आतमध्ये फीट करण्यात आलेली चीप असते. प्रोसेसरला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मानवी शरीराचे प्रत्येक कार्य आपला मेंदू नियंत्रित करतो त्याचे प्रकारे प्रोसेसरही स्मार्टफोनचे प्रत्येक कार्य कंट्रोल करतो.
ही चीप कॉम्प्युटेशन (computation)चे काम करते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास गणना, मोजणी इत्यादी कार्य हे कोर पार पाडतो. प्रोसेसरचे मोजमाप हे गीगा हर्ट्जमध्ये करण्यात येते. जो प्रोसेसर जितक्या जास्ती गीगा हर्ट्जचा असेल तितक्या वेगाने तो मोजणी किंवा गणना करणार.