सॅन फ्रान्सिस्को : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे सीईओ एलन मस्क हे आपले पद सोडणार आहेत. त्यांच्या जागी एका महिलेकडे जबाबदारी सोपवणार आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या अहवालात दावा केला आहे की एलन मस्क यांनी कॉमकास्ट एनबीसी युनिव्हर्सलच्या जाहिरात प्रमुख लिंडा याकारिनो यांच्याशी नोकरीसाठी वाटाघाटी केल्या होत्या. माध्यमातील वृत्तानुसार, मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन सीईओची निवड केली आहे. जे लवकरच पदभार स्वीकारू शकतात. मात्र, लिंडाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. नुकतेच मस्क यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ट्विटर चालवणे खूप वेदनादायक आहे.
सहा आठवड्यांत त्या पदभार स्वीकारतील : एलन मस्क यांनी ट्विट केले की, मी ट्विटरसाठी नवीन सीईओ ची निवड केली आहे हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. येत्या सहा आठवड्यांत त्या पदभार स्वीकारतील. राजीनामा दिल्यानंतर माझी भूमिका कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अशी असेल मस्क यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४४ अब्ज डॉलरमध्ये ट्विटर विकत घेतले होते. यानंतर त्यांनी सीईओ पराग अग्रवाल यांना बाहेरचा मार्ग दाखवला. कंपनी नवीन सीईओच्या शोधात होती. मस्क यांनी ट्विटरच्या सीईओपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डिसेंबरमध्ये सांगितले होते की, नवीन व्यक्ती सापडताच ते सीईओ पद सोडतील. त्यानंतर ते ट्विटरची सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीम चालवतील.