नवी दिल्ली :गेल्या काही दिवसापासून एलन मस्क आणि ओपन एआयमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र मानवी कल्याणासाठी एआय घातक असल्याचा दावा करणाऱ्या एलन मस्क यांनीच आता एआय कंपनी सुरू केली आहे. मायक्रोसॉफ्टच्या ओपन एआयला टक्कर देण्यासाठी एलन मस्कने एक्स एआय ही कंपनी सुरू केली आहे. चॅट जीपीटीच्या ChatGPT युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रोत्साहन देईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. टेक्सासमधील नेवाडा येथे ही कंपनी एलन मस्क यांनी सुरू केली आहे. या कंपनीमध्ये एलन मस्क हे एकमेव संचालक आहेत. तर एलन मस्कच्या कार्यालयाचे संचालक जेरेड बिरचॉल हे सचिव आहेत.
ओपन एआयसोबत एलन मस्कचा वाद : एलन मस्क यांनी मायक्रोसॉफ्टच्या ओपन एआयला टक्कर देण्यासाठी एक्स एआय या कंपनीची स्थापना केली आहे. मात्र सुरुवातीला एलन मस्कनेच मायक्रोसॉफ्टच्या ओपन एआय या कंपनीत 100 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती. मात्र त्यानंतर एलन मस्कने या कंपनीतून काढता पाय घेतला होता. त्यानंतर एलन मस्क यांच्यासह एक हजारावर उद्योजकांनी खुले पत्र लिहत ओपन एआय हे मानवी कल्याणासाठी हानिकारक असल्याचा दावा केला होता. त्यावरुन एलन मस्क आणि ओपन एआयच्या सीईओ यांच्यात आरोप प्रत्यारोपही झाले आहेत. विशेष म्हणजे एलन मस्कने स्थापन केलेल्या एक्स एआय कंपनीसाठी 100 दशलक्ष समभागांची विक्री अधिकृत केल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.