नवी दिल्ली : भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख नागरिकांचा कर्करोगाने मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. दरवर्षी कर्करोगाचे सुमारे 10 लाख नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे भारतीयांना कर्करोगाने किती विळखा घातला, याची प्रचिती येते. कर्करोग नियंत्रणात आणण्यासाठी रेडिएशन, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया यासारख्या उपचारांचा वापर केला जातो. मात्र या उपचारांमुळे रुग्ण थकून त्यांचे जीवनमान कमी होते. त्यामुळे केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेने (NIA) मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि जम्मू काश्मीरच्या आयुष महासंचालनालयासोबत कर्करोगविरोधी आयुर्वेदिक औषधाचा प्रभाव तपासण्यासाठी हातमिळवणी केली आहे.
कर्करोगवर आयुर्वेदिक औषध :कर्करोगावर आतापर्यंत कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नव्हते. त्यामुळे कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेडिओ थेरेपी, केमोथेरेपी आदी उपचारांचा आधार घ्यावा लागायचा. मात्र यामुळे पीडित व्यक्तीला लवकर थकवा येऊन त्यांचे जीवनमान कमी होते. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेने विकसित केलेले V2S2 हे औषध अनेक औषधी वनस्पतींच्या हायड्रो अल्कोहोलिक अर्कांपासून तयार केले आहे. प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये त्याच्या अँटी कार्सिनोजेनिक गुणधर्मांची पुष्टी झाली आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी हे औषध प्रभावी असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. त्याच्या औपचारिक इन व्हिवो चाचणीसाठी नवीनतम करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर प्राण्यांवर औषध चाचणी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जयपूर एनआयएचे कुलगुरू संजीव शर्मा यांनी दिली आहे.