हैदराबाद :आर्टीफिशियल इंटेलिजन्सने ( AI ) टेक जगतात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आगामी काळात आर्टीफिशियल इंटेलिजन्स ( AI ) वृद्धत्वाची कारणे शोधण्यातही प्रभूत्व मिळवेल असा दावा सुपर सेन्टेनेरियन्सचा अभ्यास करणाऱ्या क्रिस्टन फोर्टनी या संशोधकांने केला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठात क्रिस्टन फोर्टनी हे 110 वर्ष जगलेल्या नागरिकांच्या जनुकांवर संशोधन करत आहेत. त्यांची बायोएज ही संस्था वृद्धत्वाच्या आण्विक कारणांना लक्ष्य करून निरोगी आयुर्मान वाढवण्यासाठी उपचार विकसित करते.
रोगांना दूर ठेवण्यासाठी बायोएजींग ही चांगली संधी :क्रिस्टन फोर्टनी यांच्या या जैविक संशोधनाने सगळ्यांना आकर्षीत केले आहे. कर्करोगाच्या संशोधनासाठी अनेक नागरिक दान करत आहेत. त्यातही व्यावसाईक मानवी आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतील अशा संधीकडे आपली गुंतवणूक करतात. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील होणाऱ्या नव्या उपक्रमात नागरिकांना संबोधित करण्यासाठी आणि एकाच वेळी अनेक रोगांना दूर ठेवण्यासाठी बायोएजींग ही चांगली संधी असल्याचेही क्रिस्टन फोर्टनी यांनी स्पष्ट केले आहे.
आरोग्याचा कालावधी वाढवता येऊ शकतो :वृद्धत्वामुळे अनेक आजार होतात, असे विज्ञानात नमूद करण्यात आले आहे. अनेक जुनाट आजार, कर्करोग, स्मृतीभ्रंश आदी विनाशकारी आजार तर वयामुळेच होतात, असा दावा संशोधक करतात. मात्र विज्ञान अशा टप्प्यावर पोहोचले आहे, त्यावर आपण काहीतरी वेगळे करु शकतो, असा दावा क्रिस्टन फोर्टनी यांनी केला आहे. संशोधकांनी प्राण्यांवर अनेक यशस्वी संशोधन शोधून काढले आहे. त्यातून आरोग्याचा कालावधी वाढवता येऊ शकतो, असा दावाही फोर्टनी यांनी केला आहे. तांत्रिक प्रगती आणि आजारांवर उपचार करण्यासाठी वृद्धत्वाला लक्ष्य केल्यामुळे या क्षेत्रामध्ये लोकांची आवड निर्माण झाल्याचेही क्रिस्टन फोर्टनी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.