शेफिल्ड (यूके) : चीनमधील एका 19 वर्षीय तरुणाला स्मृतीभ्रंशाच्या आजाराने ग्रासल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याला १९ व्या वर्षीच अल्झायमर अर्थात स्मृतिभ्रंश झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जर्नल ऑफ अल्झायमर डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या केस स्टडीनुसार हे निदान करण्यात आले आहे. याबाबत अनेक चाचण्या घेतल्यानंतर बीजिंगमधील कॅपिटल मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी त्याला स्मृतीभ्रंश असल्याचे निदान केले. संशोधकांचे हे निदान बरोबर असल्यास, या आजाराने ग्रासलेला तो सर्वात तरुण व्यक्ती असल्याचे रेकॉर्ड नोंद करण्यात येईल.
वृद्धत्वामुळे होतो स्मृतीभ्रंश हा आजार :स्मृतीभ्रंश हा आजार मुख्यत: वृद्ध व्यक्तींना होतो. त्यामुळे १९ व्या वर्षीच तरुणाला स्मृतीभ्रंश झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रातही चांगलीच चर्चा करण्यात येत आहे. स्मृतीभ्रंशाची नेमकी कारणे अद्याप अज्ञात आहेत. परंतु मेंदूमध्ये दोन प्रथिने तयार होणे हे या आजाराचे शास्त्रीय कारण असल्याचे बोलले जाते. अल्झायमर असलेल्या रुग्णांमध्ये बीटा-अॅमाइलॉइड हे दोन प्रथिने मेंदूच्या पेशीच्या ( न्यूरॉन्स ) बाहेर मोठ्या प्रमाणात आढळतात.
अनुवांशिक दोषामुळे होऊ शकतो स्मृतीभ्रंश :स्मृतीभ्रंश झालेल्या 19 वर्षीय मुलाच्या मेंदूमध्ये कोणत्याही वैशिष्ट्यांची चिन्हे स्कॅनरमध्ये दाखवण्यात आली नाही. मात्र संशोधकांना रुग्णाच्या सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडमध्ये पी टाऊ 181 प्रथिनाची उच्च पातळी आढळून आली आहे. विशेषत: मेंदूमध्ये टाऊ टँगल्स तयार होण्यापूर्वी अशाप्रकारची स्थिती घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांमध्ये स्मृतीभ्रंशाची सर्व प्रकरणे अनुवांशिक दोषपूर्ण जीन्समुळे असल्याचेही यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले.