अहमदाबाद :भारतीय औषध क्षेत्रातील दिग्गज कंपनी झायडस कॅडिलाने बुधवारी असे जाहिर केले आहे की, कोविड-१९ ला रोखण्यासाठी त्यांनी विकसित केलेली प्लाझ्मिड डीएनए लस पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांमध्ये सुरक्षित असल्याचे आढळले आहे. तिचा स्वयंसेवकांवर कोणताही विपरित परिणाम आढळून आला नाही. कंपनीने आता दुसऱ्या टप्यातील क्लिनिकल चाचण्या आजपासून सुरू केल्या आहेत. १५ जुलै २०२० रोजी पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू झाल्या असून सुदृढ स्वयंसेवकांवर या लसीचा कोणताही विपरित परिणाम दिसलेला नाही.
अगोदर, क्लिनिकलपूर्व विषारीपणाची चाचणी घेण्याच्या अभ्यासात, ही लस सुरक्षित, प्रतिकारशक्ति निर्माण करणारी आणि कसलीही गुंतागुंत निर्माण न करणारी अशी असल्याचे आढळले, असे कंपनीने म्हटले आहे. प्राण्यांवर केलेल्या चाचणीत ही लस विषाणुचा प्रभाव नष्ट करणारी प्रतिपिंडे उच्च स्तरावर काढून घेण्यात सक्षम ठरली होती.
झायडस कॅडिलाचे अध्यक्ष पंकज आर पटेल यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील लसीची सुरक्षितता सिद्ध होणे हा एक महत्वाचा मैलाचा दगड आहे. पहिल्या टप्प्यातील क्निलिकल चाचण्यांदरम्यान,
लस दिल्यानंतर सुरक्षिततेसाठी पुढे ७ दिवस क्लिनिकल औषधी युनिटमध्ये सर्व स्वयंसेवकांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली आणि लस अत्यंत सुरक्षित असल्याचे आढळले. आता आम्ही दुसऱ्या टप्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. मोठ्या लोकसंख्येवर लसीची सुरक्षितता तसेच प्रतिकारशक्ति निर्माण करण्यासाठीची क्षमता यांचे मूल्यांकन करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या आहेत.
पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सर्व स्वयंसेवकांमध्ये लसीची ७ दिवस सुरक्षितता नोंदवली गेल्याने स्वायत्त डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डनेही लस धोकादायक नसल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. क्लिनिकल चाचण्यांमध्ये लसीच्या सुरक्षिततेच्या पैलूंवर देखरेख करण्यासाठी या बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी एक हजाराहून अधिक सुदृढ आणि प्रौढ स्वयंसेवकांवर झायकोव्ही-डीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यात येईल. झायकोव्ही-डीसह, कंपनीने देशात डीएनए लस तयार करण्यासाठीचे तंत्रज्ञान यशस्वीपणे स्थापित केले आहे. यासाठी कंपनीने पेशीमध्ये स्वतःचा गुणाकार न करणारा, एकात्मिक नसलेला तसेच ज्यात लसीला सुरक्षित करणारे गुणसूत्र आहे, अशा प्लाझ्मिडचा वापर केला आहे. प्लाझ्मिड म्हणजे पेशीमधील लहान, डीएनए रेणू असतो, जो स्वतंत्रपणे स्वतःचा गुणाकार करू शकतो. गुणसूत्रांमध्ये फेरफार करण्यासाठी सहसा प्रयोगशाळांमध्ये या प्लाझ्मिडचा वापर केला जातो.