रशियामध्ये युद्धजन्य हालचालींना ( Russia-Ukraine conflict ) वेग आला आहे. जगाला त्याची भीती लक्षात आली आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली. रशियाने युक्रेनमधून त्यांच्या सीमेला लागून असलेल्या दोन प्रांताना स्वतंत्र देश असा दर्जा दिल्याचे जाहीर केले. अध्यक्ष पुतीन यांनी त्याची घोषणा केली. त्यानंतर जागतिक पातळीवरील प्रत्यक्ष हालचालींना मोठा वेग आला. हा वेग येणे स्वाभाविक आणि गरजेचा आहेच. जागतिक शांततेच्या दृष्टीने ते अत्यंत महत्वाचे आहे. कारण या घडामोडींचा अन्वयार्थ लावायचा तर ही तिसऱ्या महायुद्धाची नांदीच म्हणावी लागेल.
युएसएसआरच्या विघटनातून निर्माण झालेल्या रशिया आणि इतर देशांच्या अस्तित्वाच्या संदर्भातून सध्या रशिया घेत असलेली भूमिका हा या सर्व घडामोडींच्या मुळाशी असलेला मुद्दा आहे. एकत्रित रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी रशियामध्ये अभूतपूर्व धोरण जाहीर केले. त्यातून रशियात मोठे बदल झाले. ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोयका हे दोन शब्द त्या काळात परवलीचे होते. मिखाइल गोर्बाचेव यांनी 25 डिसेंबर 1991 रोजी पॉलिट ब्युरोचा राजीनामा दिला. त्यानंतर रशियाची सूत्रे बोरिस येल्तसिन यांच्या हाती आली. हे करताना गोर्बाचेव्ह यांनी रशियामध्ये ग्लासनोस्त म्हणजेच खुली चर्चा आणि पेरेस्त्रोयका म्हणजेच पुनर्रचनेची घोषणा केली. या घोषणांनी संपूर्ण सोव्हिएत रशिया ढवळून निघाला. यातूनच एकत्रित रशियाचे विघटन युरोप आणि आशिया अशा दोन खंडात असलेल्या अर्थात ज्याला युरेशिया म्हणत असत. रशियाचे अनेक तुकडे झाले. त्यामध्ये युरोपच्या बाजूला असलेल्या छोट्या-छोट्या प्रांतांचे स्वतंत्र देशात रुपांतर झाले.
मूळ सोव्हिएत रशियाचे 15 देशांमध्ये विघटन -
रशियातून वेगळे होऊन स्वतंत्र झालेले प्रांत हे प्रामुख्याने भौगोलिकदृष्या युरोपकडच्या बाजूचे आहेत. आशियाकडील रशियाचा मोठा भाग हा एकसंघ राहिला. मात्र युरोपच्या बाजूचे प्रांत वेगळे होऊन त्यांनी स्वातंत्र्य पत्करले. मूळ सोव्हिएत रशियाचे 15 देशांमध्ये विघटन झाले. नव्याने तयार झालेल्या देशांनी आपापले स्वतंत्र अस्तित्व जपले. आजही जपत आहेत. त्याचवेळी मूळ रशियामध्ये आपण एकसंघ होतो. यापुढेही एकसंघच असले पाहिजे अशी भावनाही होती. ती भावना अलिकडच्या काळात पुन्हा उफाळून आल्याचे दिसते. त्याचाच परिणाम म्हणून पुतीन यांच्या घोषणेकडे पाहणे सयुंक्तीक ठरेल.
रशियावर आर्थिक निर्बंध -
रशियाला जोडून असलेल्या दोन देशातील काही भागावर रशियाचा अंमल आहे. एकप्रकारे जसे पाकव्याप्त काश्मीर आहे. तशाच प्रकारे हा भाग रशियाव्याप्त आहे. ते दोन देश म्हणजे डोनेत्स्क आणि लुहान्स्क. त्यांना रशियाने स्वतंत्र देशाची मान्यता दिली. हीच मोठ्या जागतिक घडामोडींची ठिणगी ठरली आहे. पुतीन यांनी याची घोषणा करताच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली. त्यामध्ये रशियाने उचललेल्या या पावलावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आला. अमेरिका आणि कॅनडाने तर रशियावर काही आर्थिक निर्बंध लागू केले. रशियाची कठोर शब्दात युक्रेनने निंदा केली. हे सर्व अपेक्षितच होते. आता पुढे काय असा प्रश्न जगापुढे आ वासून आहे.