कोविड-१९ महामारीमुळे देशातील सर्व शाळा अचानक बंद केल्या, याचा परिणाम केवळ शिक्षणावरच झाला नाही, तर मुलांना पोषक आहार देण्याच्या तरतुदीवरही झाला आहे. राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजना (ज्याला आपण एमडीएम म्हणूनही ओळखतो) ही शाळकरी मुलांना आहार पुरवणारी जगातील सर्वात मोठी योजना आहे. ज्याचा मूळ हेतू शाळेत मुलांची हजेरी वाढवणे आणि सरकारी शाळांमध्ये शिकणार्या ११.५९ कोटी मुलांच्या “पौष्टिक” आहाराची गरज पूर्ण करणे, हा आहे. कोरोना महामारी उद्भवल्यानंतर राज्यांनी थेट कुटूंबाला धान्य किंवा फुड सिक्युरिटी अलाऊन्स (एफएसए) देऊन तत्परता दाखवली होती. परंतु एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, या योजनेद्वारे पोषणयुक्त अन्न पुरवण्यासाठीची वास्तविक तरतूद पुरेशी नाही.
या योजनेची खरी समस्या ही ‘योजनेचे नियोजन आणि केंद्र व राज्य सरकारच्या फंड फ्लो सिस्टममधील गुंतागुंतीत’ आहे. कोरोना महामारीचे संकट उद्भवण्यापूर्वीही या त्रुटी अस्तित्त्वात होत्या. पण आता या त्रुटी स्पष्टपणे निदर्शनास येत आहेत. जर लवकरात लवकर या समस्याचे निराकरण केले नाही तर आपण आणखीच मोठ्या संकटात सापडू शकतो.
मार्च २०२० च्या सुरुवातीला, सर्वोच्च न्यायालयाने शाळा बंद पडल्यामुळे एमडीएमचा पुरवठा नियमितपणे होणार नाही, याचा धोका ओळखला होता. त्यामुळे देशभरातील मुलांना तसेच असुरक्षित व गरजू लोकांना पुरेसं अन्न मिळेल याची खात्री करावी, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना दिल्या होत्या. मोठ्या प्रमाणात उद्भवणाऱ्या संभाव्य कुपोषणाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी या सूचना दिल्या आहेत, असेही त्यात नमूद केले होते. त्यानंतर लगेचच शिक्षण मंत्रालयाने एक निवेदन पाठवून सर्व राज्यांना सांगितले की “गरम शिजवलेला मध्यान्ह आहार” मुलांच्या घरांना पुरवावा किंवा त्यांना “अन्न सुरक्षा भत्ता” (फुड सिक्युरिटी अलाऊन्स) द्यावा.
त्यानंतर राज्यांनी एकतर बिहारप्रमाणे रोख रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली किंवा राजस्थान आणि तेलंगणाप्रमाणे गरजू लोकांना थेट अन्नधान्याचे वाटप केले किंवा स्वयंपाकासाठी अन्नधान्य, कडधान्य, तेल आदी स्वयंपाकी वस्तू खरेदी करता येतील एवढ्या एफएसएची घोषणा केली. शिवाय केरळसारख्या राज्यात तर दूध, अंडी इत्यादींसह जेवणसुद्धा दिले जात होते. या प्रयत्नांना वित्तपुरवठा करण्यासाठी आणि उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये एमडीएम प्रदान करता यावा, यासाठी अतिरिक्त मंजुऱ्या देखील देण्यात आल्या होत्या. महामारी नसलेल्या काळात सामान्यतः उन्हाळ्याच्या महिन्यात शाळांना सुट्ट्या असतात, अशा काळात ही योजना लागू होत नसायची. पण यावेळी ही योजना उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील लागू असणार आहे.
एवढे उपाय असूनही, अद्याप बऱ्याच मुलांना आश्वासन दिल्याप्रमाणे सरकारने काहीही पुरवले नाही, हे अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे. ऑक्सफॅमने मे- जूनमध्ये ओडिशा, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांतील ११५८ पालकांच्या केलेल्या सर्वेक्षणात ही तफावत दिसून आली आहे. जवळजवळ एक तृतीयांश (३५ टक्के) मुलांना एमडीएम मिळाला नाही. हेच प्रमाण उत्तर प्रदेशात तब्बल ९२ टक्के एवढे जास्त आहे. त्याचबरोबर इतर अभ्यासांमध्ये एमडीएम न मिळणाऱ्या मुलांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात आढळली आहे.
असे का? याची संभाव्य कारणे समजून घेण्यासाठी आपल्याला योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल. अर्थसंकल्प, निधी वाटप आणि अशा योजनेचे फायदे कोण घेत आहेत? त्यासाठी संबंधित डेटाचे विश्लेषण करणे देखील आवश्यक आहे.
एमडीएम ही केंद्र सरकारकडून चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. याचाच अर्थ असा की, केंद्र आणि राज्य सरकार दोघे मिळून हा निधी उभा करतात. एमडीएम ( ही योजना थोडक्यात जाणून घेण्यासाठी येथे डाउनलोड करा) योजनेत स्वयंपाकासाठी लागणारा खर्च, स्वयंपाकी- सहाय्यकांचे मानधन व पायाभूत सुविधा (स्वयंपाकघर आणि उपकरणे) आणि इतर आवश्यक असणाऱ्या विविध कामांसाठी ६० टक्के निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करुन दिला जातो. अन्नधान्याची संपूर्ण किंमतही यात समाविष्ट केलेली असते.
सन २०२०- २१ आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला केंद्र सरकारने या योजनेसाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर यामध्ये वाढ करून हा निधी १२ हजार ६०० कोटी रुपये एवढा करण्यात आला. हे वरील अतिरिक्त १ हजार ६०० कोटी रुपये उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना एमडीएम देता यावेत, म्हणून वाढवले होते.