गेल्या वर्षभरापासून जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचे संकट निवळत असल्याचे दिसत असतानाच अनेक ठिकाणी हा आजार पुन्हा डोके वर काढत आहे. त्यामुळे युद्धपातळीवर लसीकरण मोहिम राबवून नागरिकांना यापासून सुरक्षित करण्याचे प्रयत्न जगभरातील सरकारे करीत आहेत. कोरोना संकटामुळे लावलेल्या लॉकडाऊनचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला. कोरोनाचा जबर फटका बसलेला ब्रिटन गेल्या तीन शतकातील सर्वात वाईट मंदीचा सामना करीत आहे. कोरोना नियंत्रणासाठी झटणाऱ्या ब्रिटनने आतापर्यंत दीड कोटी नागरिकांचे लसीकरणही केले आहे. मात्र अजूनही येथे कोरोनाचा प्रसार थांबताना दिसत नाही. ब्रिटनमध्ये नव्याने आढळलेला कोरोनाचा केन्ट हा प्रकार 70 टक्के जास्त घातक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणाचे मोठे आव्हान ब्रिटनसमोर आहे. ब्रिटनशिवाय जर्मनी, फ्रान्स, इस्राईल, नेदरलँड, पोर्तुगल, व्हिएतनाम हे देशही कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न करीत आहेत. लसीकरणापेक्षाही लॉकडाऊन हाच कोरोना नियंत्रणाचा प्रभावी उपाय असल्याचे मत या देशातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
लसीविषयींचा संभ्रम दूर करणे गरजेचे
देशातील 185 जिल्ह्यांमध्ये गेल्या एका आठवड्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. मात्र केरळ आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकटच अजूनही कायम असल्याचेच यावरून दिसत आहे. भारतातही कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण मोहिम राबविली जात आहे. देशात आतापर्यंत 80 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस दिली जात आहे. मात्र येत्या दोन किंवा तीन आठवड्यांत 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनाही लस देण्यास सुरूवात केली जाईल असे सरकारचे म्हणणे आहे. याशिवाय कोरोनावरील आणखी 18 लसीही देशभरात लवकरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत असे सरकारचे म्हणणे आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्याचे सरकारचे ध्येय आहे. मात्र लसीविषयी असलेल्या शंकांमुळे अनेक जण लस घेण्यात टाळाटाळ करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जर अशाच पद्धतीने लसीकरण सुरू राहिले तर देशभरातील सर्वच नागरिकांचे लसीकरण करण्यास पाच वर्षांचा कालावधी लागण्याचा अंदाज काही अभ्यासांमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे लसीविषयीची शंका आणि कोट्यवधी नागरिक लसीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र सध्या देशात बघायला मिळत आहे. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे