महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

'कोविड-१९'च्या रुग्णांमध्ये आढळली न्यूरोलॉजिकल लक्षणे..

सिनसिनाटी (Cincinnati) विद्यापीठासहीत तीन इटालियन संस्थांनी कोविड-१९ रुग्णांच्या अभ्यासात न्यूरोइमेजिंग आणि न्यूरोलॉजिकल लक्षणांचा आढावा घेतला आहे. ज्यामुळे कदाचित मध्यवर्ती मज्जासंस्थेवर कोरोना विषाणूच्या होणाऱ्या परिणामाबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती समोर येऊ शकेल.

UC study reveals neurological symptoms in COVID-19 patients
'कोविड-१९'च्या रुग्णांमध्ये आढळली न्यूरोलॉजिकल लक्षणे..

By

Published : May 31, 2020, 6:51 PM IST

हैदराबाद : सिनसिनाटी (Cincinnati) विद्यापीठासहीत तीन इटालियन संस्थांनी कोविड-१९ रुग्णांच्या अभ्यासात न्यूरोइमेजिंग आणि न्यूरोलॉजिकल लक्षणांचा आढावा घेतला आहे. ज्यामुळे कदाचित मध्यवर्ती मज्जासंस्थेवर कोरोना विषाणूच्या होणाऱ्या परिणामाबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती समोर येऊ शकेल. रेडिओलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की, कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये बदललेली मानसिक स्थिती आणि ब्रेन स्ट्रोकची लक्षणं ही न्यूरोलॉजिकल लक्षणांशी मिळतीजुळती आहेत.

रेडिओलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक अब्देलकादेर महम्मदी म्हणाले की, “या अभ्यासात कोविड-१९ च्या चेस्ट इमेजिंग वैशिष्ट्यांचे विश्लेषण केले आहे. तसेच काही रुग्णांमध्ये कोविड-१९ संबंधित न्यूरोइमेजिंगच्या निष्कर्षांचे वर्णन केले आहे.”

“आतापर्यंत हा कोविड-१९ च्या रूग्णांमधील न्यूरोलॉजिकल लक्षणे आणि न्यूरोइमॅजिंगची वैशिष्ट्ये दर्शविणारा हा साहित्यातील सर्वात मोठा आणि पहिलाच अभ्यास आहे. हे नवीन सापडलेले निष्कर्ष डॉक्टरांना अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतील. सोबतच अलिकडील घडामोडीची माहितीही प्रदान करु शकेल,” असेही प्राध्यापक महम्मदी म्हणाले.

ब्रेस्सिया विद्यापीठ, इस्टर्न पाइडमोंट (Eastern Piedmont) विद्यापीठ आणि इटलीमधील सस्सारी (Sassari) विद्यापीठातील संशोधकांनी एक अभ्यास केला ज्यामध्ये त्यांनी रुग्णांमधील न्यूरोलॉजिकल लक्षणांची आणि इमेजिंगच्या निष्कर्षांची तपासणी केली आहे.

इटली हा कोविड-१९ च्या प्रसाराचा दुसरा सर्वात मोठा केंद्रबिंदू होता, परिणामी त्याठिकाणी ३० हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कोविड-१९च्या रोगाची पुष्टी झालेल्या ७२५ रूग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये १०८ म्हणजेच एकूण रुग्णाच्या १५ टक्के रुग्णांना गंभीर न्यूरोलॉजिकल लक्षणे आणि मेंदू किंवा मणक्याचे इमेजिंग आढळले.

या अभ्यासाचा भाग म्हणुन ९९ टक्के रुग्णांचे ब्रेन सीटी स्कॅन करण्यात आले. तर १६ टक्के रुग्णांचे डोके व मान सीटी इमेजिंग आणि १८ टक्के रुग्णांचे ब्रेन एमआरआय करण्यात आले. हा अभ्यास २९ फेब्रुवारी ते ४ एप्रिल दरम्यान दाखल झालेल्या कोविड-१९च्या रुग्णांवर करण्यात आला.

या अभ्यासात संशोधकांना असे आढळले आहे की, ५९ टक्के रुग्णांच्या मानसिक स्थितीत बदल झाला होता. तर ३१ टक्के रुग्णांना ब्रेन स्ट्रोक, १२ टक्के रुग्णांना डोकेदुखी, ९ टक्के रुग्णांची शुद्ध हरपली तर ४ टक्के रुग्णांना चक्कर आली अशा प्रकारची इतर लक्षणे आढळून आली.

डॉ. महम्मदी म्हणाले की, "या ११८ रुग्णांपैकी ३१ रुग्णांना यापूर्वीचा कसलाही वैद्यकीय इतिहास नाही. यापैकी १६ ते ६२ वर्षे या वयोगटातील १० रुग्णांना ब्रेन स्ट्रोक आणि दोन रुग्णांना मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निदर्शनास आले. तसेच यातील ६६ टक्के रुग्णांच्या ब्रेन सीटी स्कॅन वर कोणताही परिणाम आढळला नाही. तर ३५ टक्के रुग्णांच्या मेंदू एमआरआयमध्ये अस्वभाविक लक्षणे आढळून आली." ज्येष्ठ नागरिकांमध्ये बदललेली मानसिक स्थिती ही अधिक सामान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

"सध्या आमच्याकडे कोविड-१९ च्या रूग्णांमधील न्यूरोलॉजिकल लक्षणांसंबंधी खुप कमी माहिती आहे. परंतु हा आजार पूर्वीच्या गंभीर आजारातुन किंवा सार्स-सीओव्ही-२ विषाणूचा मध्यवर्ती मज्जासंस्थेवर केलेल्या आक्रमणातून उद्भवला आहे. आम्हाला आशा आहे की, या विषयावरील पुढील अभ्यास या आजारांचे संकेत शोधून काढण्यास आणि रूग्णांना चांगल्या प्रकारे उपचार देण्यास मदत करेल," असे महम्मदी पुढे म्हणाले.

या अभ्यासात आणखी काही महत्त्वाची माहिती मिळेल का? त्यावर सध्या लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच या विषयावर आणखी अधिकचे संशोधन करण्याची गरज आहे, असेही महम्मदी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details