हैदराबाद : शिवसेनेकडून राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री, कंगना रणौत यांना घाबरवण्याचा आणि तिच्या मालमत्तेला नुकसान पोहचवण्याच्या केलेल्या आचरट प्रयत्नांचा; देशात लोकशाही आणि कायद्याचे राज्य मानणाऱ्या प्रत्येकाने निषेध केलाच पाहिजे. आता शिवसेनेला ‘मुंबई तुमच्या मालकीची नाही’ आणि कोणत्याही भारतीयांना मुंबईत प्रवेश करण्यासाठी शिवसेनेच्या व्हिसाची गरज नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे. मुंबई ही संपूर्ण भारताची आहे.
मुंबई महानगरपालिकेने कंगना रणौत यांना अतिक्रमण केल्याची नोटीस पाठवून दुसऱ्याच दिवसी ९ सप्टेंबर रोजी पाली हिल भागातील त्यांची मालमत्ता जमीनदोस्त केली गेली. पण त्यापूर्वी शिवसेनेचे काही नेते आणि पक्षाच्या गुंडांनी त्यांना वारंवार धमकी दिली होती. शिवाय त्यांनी कंगनाला हिमाचल प्रदेशहून मुंबईत आपल्या राहत्या घरी न येण्याचा इशारा दिला होता. अशा प्रकारच्या धमक्या घालणाऱ्यांमध्ये राज्याचे गृहमंत्रीही होते. याव्यतिरिक्त, पक्षाच्या काही नेत्यांनी तिच्यावर अश्लील शिवीगाळही केली. भारत जर अशा गोष्टींना थारा देत असेल, तर येत्या काळात देशात लोकशाहीला निरोप दिलेला असेल आणि यापुढे अशाप्रकारच्या ‘गुंडाराज’ ला राजकीय मान्यता मिळून जाईल.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. जयराम ठाकूर यांनी कंगना रणौत यांच्या बाजूने आपले शस्त्र उचलले आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारचे अशाप्रकारचे वागणे “निंदनीय” असल्याचे म्हणत सूडबुद्धीच्या राजकारणाला चपराक मारली. ते पुढे म्हणाले की, “हिमाचलच्या मुलीचा” असा अनादर करणे, हे अस्वीकार्य आहे.
या अभिनेत्रीला रोखण्याचा शिवसेनेचा मनसुबा आणि पक्षाच्या गुंडांची तैनात केलेली ताकद लक्षात घेता, ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत पोहोचल्यावर तिला “वाय प्लस” श्रेणीतील सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी हिमाचल प्रदेश सरकारने केंद्र सरकारकडे केली होती. आणि ती त्वरित मान्यही झाली. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याबाबत सावध राहायला पाहिजे. कारण इतर कोणत्याही राज्यातील नागरिकांसोबत शिवसैनिकांचे अशा प्रकारचे वर्तन येथून पुढे कोणीही सहन करून घेणार नाही.
त्याचबरोबर, मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेच्या कारवाईवर ताशेरे ओढले असून ही कारवाई निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने महानगरपालिकेच्या या कृतीचे वर्णन “दुष्ट हेतूने केलेली कारवाई” असे केले आहे. न्यायालयाने नमूद केले की, महानगरपालिका ज्याला “अनधिकृत” बांधकाम म्हणते, ते बांधकाम काही एका रात्रीत उभारलेले नाही. ज्यामुळे महानगरपालिकेला अचानक जाग आली आणि त्यांनी कंगना रणौत शहरात नसताना त्यांना नोटीस बजावली. शिवाय अवघ्या २४ तासांची मुदत देऊन ते बांधकाम पाडले गेले. या सर्व बाबी लक्षात घेता महानगरपालिकेने केलेली ही कारवाई सूडबुद्धीने केली असल्याचे सूचित होते. त्याचबरोबर महानगरपालिकेची बाजू मांडणारा वकील वेळेवर हजर नसल्याने आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता; आयुक्तांचा फोन दिवसभर बंद लागत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. यादरम्यान तोडफोड सुरूच होती. याव्यतिरिक्त, मुंबईतील इतर असंख्य अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत महानगरपालिका अशाच जलद गतीने कार्यवाही करेल का ? असेही न्यायालयाने यावेळी विचारले.
महानगरपालिकेने सुनावणी टाळण्यासाठी केलेला जाणीवपूर्वक प्रयत्न आणि ते अतिक्रमण हटवेपर्यंत न्यायालय अडथळा आणणार नाही, याची घेतलेली काळजी, याबाबतची तपशीलवार नोंद न्यायालयाने आपल्या ९ सप्टेंबर रोजीच्या आदेशात केली आहे. हा महानगरपालिकेचा उद्धटपणा आणि न्यायपालिकेप्रति असलेला अनादर प्रतिबिंबित करते, असेही न्यायालयाने नमूद केले.
शिवसेनेला हे सांगावे लागेल, की त्यांनी मुंबई विकत घेतली नाही. ते बऱ्याच दिवसांपासून या भ्रमात जगत आहेत. खरं तर, जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं यासाठी आंदोलने सुरू होती. तेव्हा बॉम्बेत (त्यावेळी मुंबईला बॉम्बे असं संबोधलं जात) ज्यांची मालमत्ता अधिक होती; असे गुजराती आणि इतर लोकं आणि मुंबईतील मराठी भाषिकांनी मुबंई ही केंद्रशासीत प्रदेश असावी, अशी जोरदार मागणी केली होती.
अगदी तेव्हापासून या शहराचा लोकमानस नेहमीच वैश्विक आणि बहुसांस्कृतिक राहिला आहे. शिवसेनेने सर्व प्रकारचा विषारी कट्टरतावाद मुंबईच्या मुख्य राजकारणात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मुंबईने आपला आंतरराष्ट्रीय संपर्क तोडण्यास नेहमीच नकार दिला आहे.