सर्वसमावेशक विकास / वृद्धी, सुशासन आणि सामान्य नागरिकांच्या सबलीकरणासाठी डिजिटल तंत्रज्ञान कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावू शकते याचा एक जागतिक मापदंड डिजिटल इंडियाच्या यशाने निश्चित केला आहे. काही वर्षांपूर्वी श्रीमंत वर्गापुरतेच मर्यादित असलेले डिजिटल तंत्रज्ञानाचे फायदे आता सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध झाले आहेत. वेगाने बदलणार्या तंत्रज्ञानाच्या काळात नव्याने निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सातत्याने विकसित होणारी प्रणाली, नियामक संस्थांकडून वेगवान आणि आवश्यक तो प्रतिसाद गरजेचा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे आगमन हा केवळ उपलब्ध तंत्रज्ञानाच्या काळातील आणखी एक अधिकचे तंत्रज्ञान नसून तंत्रज्ञानाच्या लँडस्केपमधील एक प्रमुख टप्पा आहे, जो मानवतेच्या कल्याणासाठी समग्रपणे पाहिला जाणे आवश्यक आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीसाठी डेटा हा मूलभूत घटक आहे. भारतातील 70 कोटीहून अधिक इंटरनेट ग्राहक 1.21 अब्ज फोन वापरकर्ते आणि 1.26 अब्ज आधार कार्डधारक दररोज मोठ्या प्रमाणात डेटा तयार करीत आहे. जगातील प्रमुख इंटरनेट कंपन्यांचे सर्वाधिक ग्राहक भारतात आहेत. जगाच्या तुलनेत सर्वात स्वस्त इंटरनेट सेवा भारतात मिळते. जागतिक पातळीवर भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने आपले कर्तृत्व या अगोदरच सिद्ध केले असून कुशल आणि सक्षम मानव संसाधनांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे.
नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास नेहमीच प्रोत्साहन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात कृत्रिम बुद्धिमत्तेत क्रांती करण्यास भारत तयार झाला आहे. 2018 मध्ये, भारत सरकाने राष्ट्रीय एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) धोरण प्रकाशित केले. त्यानंतर, देशात मजबूत एआय इकोसिस्टिम विकसित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
सरकारी विभागांना तज्ञांकडून डेटा विश्लेषण सेवा प्रदान करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स इन डेटा एनालिटिक्सची (सीईडीए) स्थापना करण्यात आली आहे. आयटी उद्योगाच्या सहकार्याने बंगळुरू, गांधीनगर, गुरुग्राम विशाखापट्टणम येथे सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली गेली आहे. या माध्यमातून आतापर्यंत 113 स्टार्टअप्स, 29 बौद्धिक संपत्ती / इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज तयार करण्यात आल्या असून 56 क्षेत्रीय सुविधा केंद्रे विकसित करण्यात आली आहेत.
चार लाख प्रोफेशनल्सना / व्यावसायिकांना फायदा व्हावा या उद्देशाने उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये आणि या क्षेत्रात नव्याने निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी व्यावसायिकांना कौशल्य मिळविण्यासाठी फ्युचर स्किल्स ऑनलाईन प्राईम प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी सहयोग आणि माहितीच्या सुलभ वाहनासाठी वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून नॅशनल आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी घेतल्यानंतर लवकरच इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करणार आहे. आधार, यूपीआय, जीएसटीएन आणि जेएम / GeM यासारख्या सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अनुभवावरून, आरोग्य, कृषी, शिक्षण, लॉजिस्टिक्स, भाषांतर इत्यादी क्षेत्रात अनेक सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु करण्याचे सरकारने निश्चित केले आहे.
2020 च्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केल्यानंतर आरोग्यासाठी सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम सुरू केले आहे. इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालय शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, उद्योग आणि स्टार्टअप्स यांच्या सहकार्याने एआय आधारित नॅचरल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन विकसित करीत आहे, जे भारतीय भाषांमध्ये व्हॉईस / आवाजावर आधारित सक्षम इंटरनेटचा मार्ग प्रशस्त करेल.
अशाच प्रकारे भारत सरकारची विविध मंत्रालये उद्योग, शैक्षणिक आणि स्टार्टअपच्या सहकार्याने क्षेत्रीय पातळीवर सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्मला अंतिम रूप देण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पोचले आहेत. हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेच्या समस्येवर लक्ष देतानाच त्यांच्या क्षेत्रातील एआय आधारित सेवा देतील. या प्लॅटफॉर्ममुळे भारतीय स्टार्टअपसाठीही मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतील.