हैदराबाद :जॉर्ज फ्लाॅइड हे अमेरिकन पोलिसांचा अत्याचाराचे बळी आहेत. कृष्णवर्णीय व्यक्तींना अमेरिकेत अत्यंत दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. गोऱ्या अमेरिकनांकडून अफ्रिकन अमेरिकनांना रोजच भेदभाव, शोषण आणि छळाला सामोरे जावे लागत असल्याचे मत सध्या अमेरिकेत अफ्रिकन अमेरिकन नागरिकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या, आणि मूळच्या महाराष्ट्राच्या असणाऱ्या प्राची पाटणकर यांनी व्यक्त केले आहे. 'ईटीव्ही भारत'सोबतच्या विशेष बातचीतमध्ये न्यू यॉर्कहून सहभागी होत प्राची पाटणकर म्हणाल्या, सध्या अमेरिकेत अफ्रिकन अमेरिकन आणि काही गोऱ्या अमेरिकनांकडून सुरु असलेले आंदोलन हे कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्धचा उठाव आहे. या आंदोलनाचे पडसाद अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीवरही होण्याची शक्यता पाटणकर यांनी वर्तवली.
कृष्णवर्णीयांचा उद्रेक हा उठाव - प्राची पाटणकर 'अमेरिकेसारख्या महासत्तेमध्येच असं घडू शकते'
भारतामध्येही जिथे एखाद्याला भर रस्त्यावर पोलिसांकडून मारले जाण्याचा प्रकार घडू शकत नाही तिथे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात दिवसाढवळ्या भररस्त्यावर एका कृष्णवर्णीय व्यक्तीला श्वास रोखेपर्यंत मारण्यात आले हे कसे घडू शकते, या प्रश्नावर प्राची पाटणकर म्हणाल्या, हे अमेरिकेतच घडू शकते. ते का, हे समजून घेण्यासाठी अमेरिकेचा इतिहास आपल्याला तपासला पाहिजे. आज रस्त्यावर सुरु असलेला उठाव आणि चळवळ ही अफ्रिकन अमेरिकनांवर होत असलेल्या छळाचा शोषणाचा उद्रेक आहे. अमेरिकन लोकांनी अफ्रिकन अमेरिकनांनी साधारण ४०० वर्षे गुलाम म्हणून वागवले आहे. काही गोऱ्या अमेरिकनांमध्ये आजही तोच वंशवाद आहे. त्यामुळेच अफ्रिकन अमेरिकन यांच्याकडे गुन्हेगार, गुलाम म्हणूनच पाहिले जाते. त्यांच्यासोबत भेदभाव, शोषण आजही सुरु आहे. पोलिसही त्यांचा वारंवार छळ करतात. ४०० वर्षांच्या गुलामीत याची कारणे सापडतात.
फक्त जॉर्जच नाही...
जॉर्ज फ्लाॅइड यांच्या मानेवर पोलिसांनी आठ मिनिटे पाय ठेवून त्याला ठार मारले. कृष्णवर्णीय जॉर्ज हा एकटाच पोलीस छळाचा बळी नाही, तर याआधीही हजारो अफ्रिकन अमेरिकन नागरिकांना पोलिसांनी अशाप्रकारे मारले आहे. बियाना टेलर या अफ्रिकन अमेरिकन मुलीला पोलिसांनी तिच्या घरात घुसून मारले. मध्यरात्री पोलिस तिच्या घरात घुसतात आणि तिची हत्या करतात. अमोड आब्रि या अफ्रिकन अमेरिकन व्यक्तीला तो त्याच्या घराजवळ जॉगिंग करत असताना मारले होते. दोन गोऱ्या अमेरिकन नागरिकांनी आब्रिला पाठलाग करुन त्याची हत्या केली. जणूकाही एखाद्या पशूच्या मागे जाऊन त्याला मारावे तशा पद्धतीने आब्रिला मारण्यात आले. हे तिघेच नाही तर अशी हजारो उदाहरणे अमेरिकेत आहे. त्याचा उद्रेक हा जॉर्ज फ्लाइडच्या हत्येनंतर उफाळून आला असल्याचे प्राची पाटणकर यांनी सांगितले.