इंटरनेटचे युग सुरू होऊन आता जमाना झाला. त्याच्याच आधारे सध्या सोशल मीडिया किंवा समाजमाध्यमांचे युग सुरू आहे असे म्हणता येईल. त्याचबरोबर आर्थिक, व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक अशा सर्वच प्रकारचे व्यवहार आता-आतापर्यंत संस्थांच्या माध्यमातून इंटरनेटच्या महाजालामध्ये सुरू होते. आता हे व्यवहार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सुरू झाले आहेत. फोन पे, गुगल पे, पेटीएम बरोबरच आता विविध कंपन्या तसेच व्हॉट्स अपसारख्या समाज माध्यमातूनही पैशांचा व्यवहार आपण करू शकतो. जगभरात अशा कंपन्यांचा सुळसुळाट झालेला दिसतो.
'फोननंबरच्या सुतावरुन स्वर्ग गाठता येऊ शकतो अशी परिस्थिती आहे'
कोणत्याही पैशाचा व्यवहार करण्यात येणाऱ्या अॅपमध्ये किमान काही माहिती देणे बंधनकारक असते. यामध्ये नोंद करण्यासाठी आपला फोन नंबर तर अत्यावश्यक असतोच, त्याचबरोबर आपली इतरही माहिती तसेच आपल्या खात्याची माहिती घेण्यात येते. तांत्रिक माहिती असेल तर इंटरनेटच्या महाजालात एवढी जोडाजोडी आहे की, फक्त फोननंबरच्या सुतावरुन स्वर्ग गाठता येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. यातून आर्थिक गैरव्यहार, आर्थिक चोरी या गोष्टी तर आता सरावलेल्या आहेतच. त्याचबरोबर प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि खासगी गोष्टी यावरही नजर ठेवली जात आहे हे आज त्रिकालाबाधित वास्तव आहे.
'डाटाची चोरी करुन त्याचा व्यावसायिक वापर सर्रास होताना दिसतो'
डाटा हा आज परवलीचा शब्द झालेला आहे. मात्र याच डाटाची चोरी करुन त्याचा व्यावसायिक वापर सर्रास होताना दिसतो. तसेच बदनामी आणि खंडणी वसुलीसाठीही याचा उपयोग होत असल्याची उदाहरणे आहेत. हे सगळे आपल्या नकळत घडत असते असे म्हटले तर तांत्रिक दृष्ट्या सर्वसाधारणपणे ते योग्य ठरणार नाही. कारण आपण कोणतीही माहिती देताना, तसेच देण्यापूर्वी आपल्याला सर्व संबंधित अटी आणि शर्थी सांगितलेल्या असतात. आपण त्या सर्व अनाहुतपणे मान्य केलेल्या असतात. त्यामुळे एकप्रकारे आपणच स्वतःचे कपडे काढून त्यांच्या हाती दिलेले असतात असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
'सोशल मीडिया हँडल तसेच इतर माध्यमातून आपला नंबर आणि आपली माहिती संबंधित कंपन्यांकडे पोहोचलेली असते'
एकदा का आपल्या माहितीची दोरी संबंधित कंपन्यांच्या हाती गेली की त्यांचा खेळ सुरू होतो. याची सुरुवात आपणच करतो. यासाठी साधं उदाहरण देता येईल. आपण एखाद्या पॉश मॉल किंवा साखळी दुकानात जातो. त्यावेळी बिल करताना आपल्याला फोन नंबर विचारला जातो. आपण सहजच आपला फोननंबर तिथे काउंटरला देतो. तो नंबर सिस्टिममध्ये टिपून घेण्यात येतो. त्यानंतर आपल्यामागे मेसेजचा ससेमिरा... अधून-मधून कॉल येणे सुरू होते. अनेकदा असे अनुभवास येते की, आपला नंबर या कंपनीला मिळालाच कसा असा प्रश्न पडेल अशा प्रकारच्या कंपन्यांकडूनही आपल्याला फोन यायला लागतात, मेसेज यायला लागतात. वास्तविक सोशल मीडिया हँडल तसेच इतर माध्यमातून आपला नंबर आणि आपली माहिती संबंधित कंपन्यांकडे पोहोचलेली असते. आपल्या नंबर तसेच सोशल मीडिया हँडलवरील आपल्या हालचालीवरुन आपली आवड-निवड निश्चित होत असते. त्यावर ज्यांच्या-ज्यांच्याकडे आपला नंबर असतो, त्यांची नजर असते. मग आपल्याला फोन येणे, मेसेज येणे सुरू होते. हे एकप्रकारचे जाळे असते. या जाळ्यात आपण जर बेसावध राहिलो तर अलगदपणे अडकतो. मग ते क्रेडिट कार्डचे मेसेज असो किंवा विम्याचे किंवा समाज माध्यमावर फ्रेंडरिक्वेस्टचे...
'आपल्यापुढे 'अपडेट'चा पर्याय ठेवला जातो'