10 फेब्रुवारी हा दिवस जागतिक डाळ दिन म्हणून साजरा केला जातो. 'शाश्वत भविष्यासाठी पोषक बी' ही यंदाच्या डाळ दिनाची थीम आहे. आरोग्याच्या दृष्टीने डाळ हा उच्च पोषणयुक्त आहार आहे. असे असूनही अनेकजण डाळींच्या पोषणमूल्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रत्येकाच्याच आहारात डाळींचा समावेश नाही हे वास्तव आहे. हीच बाब लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्राने 2018 मध्ये डाळींचे महत्व अधोरेखित करण्यासाठी एक दिवस निश्चित करण्याचा निर्णय घेतला.
2019 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय डाळ दिन साजरा
अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने 10 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय डाळ दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानुसार 10 फेब्रुवारी 2019 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय डाळ दिन साजरा करण्यात आला. अलिकडील काळात भारतात डाळींच्या सेवनाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हा दिवस आणखीनच महत्वाचा ठरत आहे.
डाळीसंदर्भातील महत्वाची तत्थ्ये
⦁ लॅटीन भाषेतील पल्स या शब्दापासून डाळींना इंग्रजीत पल्स असे संबोधले जाते. कठोर किंवा भरीव असा या शब्दाचा अर्थ आहे.
⦁ अनेक शतकांपासून मानव डाळींचे सेवन करीत असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. इसवी सन पूर्व 7 हजार ते 8 हजार वर्षांपूर्वी तुर्कीतील माणूस हरभरा आणि मसूरची शेती करत असल्याचे पुरावे पुरातत्व अवशेषांतून मिळाले आहे.
⦁ 1 पौंड डाळीच्या उत्पादनासाठी 43 गॅलन पाणी लागते. तर तेवढ्याच सोयाबीनच्या उत्पादनासाठी 216 गॅलन आणि शेंगदाण्याच्या उत्पादनासाठी 368 गॅलन पाणी लागते.
⦁ बहुतांश डाळपिके ही मुख्यत्वे नत्र स्थिरीकरणाचे काम करतात. त्यामुळे जमीनीची सुपिकता वाढविण्यासाठीही डाळपिके सहाय्यभूत ठरतात.
⦁ डाळ हे सुकलेल्या बियांच्या स्वरुपात असल्याने ते दीर्घकाळ चांगले राहते. तसेच त्यांच्या पोषणमूल्यातही घट होत नाही. त्यामुळे अन्न सुरक्षेच्या दृष्टीकोनातून डाळ अतिशय महत्वाची ठरते.
⦁ बहुतांश डाळपिके कमी पाण्यावरही तग धरतात. दुष्काळ स्थिती सहन करण्याची क्षमता असल्याने वेगवेगळ्या ऋतुत आणि पर्यावरणात याचे उत्पादन घेणे शक्य होते.
⦁ डाळींमध्ये प्रथिने, तंतूमय पदार्थ, कॅल्शियम, लोह, आम्ल, क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
⦁ कमी उत्पन्न असलेल्या देशांत प्रथिन सेवनात डाळींचा 10 टक्के वाटा आहे. तर शरीराला ऊर्जा पुरविणाऱ्या घटकांमध्ये 5 टक्के वाटा डाळींचा आहे.