हैदराबाद : कोविड-19 महामारीचा लठ्ठ लोकांवर लक्षणीय परिणाम होत आहे, कारण यामुळे त्यांना आपले वजन आणि मानसिक आरोग्य सांभाळणे कठीण जात आहे, असे संशोधकांना आढळून आले आहे.
क्लिनिकल ओबेसिटी या नियतकालिकात हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला. याअंतर्गत, वजन व्यवस्थापन करणाऱ्या 123 रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून असा निष्कर्ष पुढे आला की, 73 टक्के रुग्णांनी आपली अस्वस्थता वाढत असल्याचे अनुभवले आणि सुमारे 84 टक्क्यांमध्ये नैराश्य वाढले होते.
"संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सर्वांना घरी राहण्यास सांगण्यात आले होते. विशेषतः अधिक प्रमाणात लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी हे महत्त्वाचे होते. कारण, त्यांच्या तब्येतीसंदर्भात गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता आणि कोरोना विषाणूमुळे मृत्यूचा धोका अधिक आहे", असे अमेरिकेतील ह्युस्टन येथील टेक्सास विद्यापीठातील अभ्यासक सारा मेसिआह यांनी सांगितले. मेसिआह या संशोधन अभ्यासाच्या लेखक आहेत.
15 एप्रिल ते 31 मे दरम्यान आयोजित ऑनलाईन प्रश्नावलीतून या अभ्यासासाठी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. सहभागी लोकांचे सरासरी वय 51 होते आणि महिलांचे प्रमाण 87 टक्के होते. या सर्व रुग्णांचा सरासरी बॉडी मास इंडेक्स 40 होता.
सुमारे 70 टक्के लोकांनी वजन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे, 48 टक्के लोकांनी व्यायामासाठी कमी वेळ मिळत असल्याचे सांगितले. याशिवाय, 56 टक्के लोकांमध्ये व्यायामाबाबत कमी तीव्रता होती. निम्म्या रुग्णांमध्ये अन्न साठवून ठेवण्याचे प्रमाण वाढले आणि 61 टक्के लोकांमध्ये भूक नसतानाही खाण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले.
संशोधकांच्या मते, दोन रुग्णांची सार्स-कोविड-2 ची चाचणी सकारात्मक आली. मात्र, 15 टक्के रुग्णांमध्ये विषाणूची लक्षणे आढळून आली. सुमारे 10 टक्के रुग्णांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आणि 20 टक्के रुग्णांनी सांगितले की त्यांना समतोल आहार घेणे परवडत नाही.