हैदराबाद -स्वाभिमानाने मानव म्हणून जगण्याच्या अधिकाराचा खरा आनंद काही जणांनाच का मिळत आहे? या देशातील कोट्यवधी लोक अजूनही काहींनी केलेली घाण साफ करण्यात आपले आयुष्य का व्यतीत करत आहेत? ज्यावेळी यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करतो तेंव्हा कायदे आणि सरकार यांना दोष देणे सामान्य आहे. कोणतेही विश्लेषण बाहेरील स्थितीवरील एखाद्या मुद्द्याला वरवर स्पर्श करते. परंतु, समस्येचे मूळ स्रोत मात्र जिवंत ठेवते. शतकानुशतके चालत आलेल्या भेदभावामुळे विशिष्ट समाज किंवा वर्ग आजदेखील शिक्षण आणि आर्थिक समानतेपासून वंचित राहिला आहे. सफाई कामगार हे यामागचे एक ठळक उदाहरण आहे. मानवी मलमूत्र काढून टाकण्यासाठी वंचित घटकातील माणसांचा वापर करण्याची प्रथा अजूनही या देशात कायम आहे. अधिनियमित कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास अक्षम असणाऱ्या आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथांकडे दुर्लक्ष करणे हे सरकारांच्या अकार्यक्षमतेचे लक्षण आहे.
मानवी अधिकारांचे उल्लंघन -
संविधान व्यक्तींच्या किंवा नागरिकांच्या सन्मानाची हमी देते. सार्वजनिक आरोग्य सुनिश्चित करणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य म्हणून घोषित केले आहे. त्या दृष्टीने सरकारने १९९३मध्ये 'मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स एम्प्लॉयमेंट अँड ड्राय लॅट्रिन्स प्रोहिबिशन ऍक्ट' बनवला. कुठल्याही टप्प्यावर कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली नव्हती कारण राज्यांनी याला प्रतिसाद दिला नाही. वीस वर्षांनंतर, २०१३ मध्ये आणखी एक कायदा पास करत मानवी मलमूत्र साफ करण्यासाठी मानवांच्या वापरावर बंदी आणली तसेच हे काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या पुनर्वसनासाठी कायदेशीर हमी दिली. मानवी मलमूत्र साफ करण्यासाठी माणसांचा वापर केल्यास पाच वर्षापर्यंत कारावासाची आणि पाच लाख रुपयांच्या दंडाची तरतूद कायद्यात प्रस्तावित आहे. पण दुर्दैव म्हणजे आजदेखील देशातील कोट्यावधी लोक या ‘व्यवसायात’ काम करीत आहेत आणि २०१३ च्या कायद्यांतर्गत मागील सात वर्षांत कोणालाही दंड ठोठावल्याची नोंद नाही. अजूनही देशभरात ७ लाख ७० हजार सफाई कामगार मलमूत्र साफ करण्याच्या व्यवसायात कार्यरत आहेत. तर मानवी विष्ठा हाताने उचलून ती टोपलीमध्ये टाकण्याच्या क्रूर कृतीत हजारो लोक गुंतलेले आहेत. असा अंदाज आहे की अद्यापही भारतीय रेल्वेमध्ये हजारो सफाई कामगार काम करतात. अधिकृत आकडेवारीतुन कितीही लपविले तरी काही अभ्यासातून असे दिसून आले आहे गटारे किंवा सांडपाणी किंवा सेप्टिक टाक्या साफ करताना विषारी वायूंच्या संपर्कात येऊन देशात दरवर्षी सरासरी १७०० लोकांना आपले प्राण गमवावे लागतात.