हैदराबाद - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन संपूर्ण जगामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्याने मनुष्य प्राण्याला जवळपास दीड महिना घरातच बसावे लागले. त्यामुळे बहुतेक लोकांच्या असे निदर्शनास आले आहे की, निसर्गाने पून्हा एकदा श्वासोच्छवास सुरू केला आहे. मनुष्य घरात बसल्याने निसर्गातील हवा शुद्ध झाली आहे, झाडे हिरवीगार झाली आहेत आणि नद्याही स्वच्छ झाल्या आहेत. हा पर्यावरणाचा र्हास होण्यामध्ये मानवच जबाबदार असल्याचा हा थेट पुरावा आहे.
या परिस्थितीने ‘मानव हा निसर्गाचा स्वामी नाही’ हे पून्हा एकदा सिद्ध केले आहे. तो कधीही निसर्गावर नियंत्रण मिळवू शकत नाही किंवा प्रयत्नही करू शकत नाही. खरं तर मानवाच अस्तित्वचं मुळतः निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग मनुष्याचे पालनपोषण करतो म्हणूनच मनुष्याच्या जीवन-मृत्यूवरही निसर्गाचच नियंत्रण आहे. मनुष्य हा पृथ्वीवरच्या सजीव आणि निर्जीव घटकांनी बनलेल्या एका जटील जाळ्याचा एक छोटासा भाग आहे. मानवी जीवनाला आधार देण्यासाठी पृथ्वीवरच्या असंख्य घटकांची परस्पर क्रिया होत असते. निसर्ग हा विविधतेत एकता या संकल्पनेचं एक अद्भुत उदाहरणं आहे. हे सध्याच्या संकटातुन समोर आलेलं अंतिम सत्य आहे. म्हणुन मानवांनी या ब्रम्हांडातील विविध प्रजातींच्या विविधतेतील एकतेचा आदर करायला शिकले पाहिजे. त्यांची जीवनशैली ही निसर्गाशी एकरुप होण्याची आहे. पृथ्वीतलावरचे संतुलन बिघडवण्यासाठी त्यांची निर्मिती झालेली नाही. मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यापलीकडे ज्याकाही मोठ्या प्रमाणावर मानवी क्रिया घडत असतात. जसे की समुदायाच्या गरजेपेक्षा अधिक मिळवण्यासाठी मनुष्याने नैसर्गिक व्यवस्थेचे केलेले शोषण. या सर्व कारणांमुळे मानवचं स्वतःच्या सर्वनाशाचे कारण बनत चालला आहे.
‘भौतिक फायद्यासाठी सुसाट वेगाने धावणं’ हे कालपर्यंत या महान जगतातील अपरिहार्य गोष्ट वाटत होती, पण आज मात्र हे सर्व अचानक थांबले आहे. ट्रेनच्या प्रवासामुळे खुप वेळ वाया जातो म्हणुन विमानाने प्रवास करणारे लोकंही घरातुन एक पाऊलही बाहेर ठेवायला धजावत आहेत. दैनंदिन जीवनात पैशाला महत्त्व आहेच. परंतु सध्या खिशात पैसा असूनही आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीही आपण बाजारातून खरेदी करू शकत नाही. मग अशा पैशाचा काय उपयोग? या दीड महिन्याच्या लॉकडाऊनमुळे आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला इतक्या पैशांची किंवा संसाधनांची खरोखर गरज नाही हेसुद्धा लक्षात आले आहे.
कोरोना विषाणूचा हा धोका सर्व मानवजातील एका समान पातळीवर आणणारा ठरला आहे. कोणताही भेदभाव न करता त्याने सर्व मानवांना बरोबरीत आणले आहे. कोरोनामुळे श्रीमंत आणि सामर्थ्यवान लोकांनाही गरिब व्यक्तीप्रमाणे असुरक्षित वाटत आहे. यातुन एक संदेश मिळाला आहे तो म्हणजे, सध्या अस्तित्वात असलेल्या मानवी निर्मित सर्व श्रेण्या (गट) किंवा विशेष पदं याला कसलाही अर्थ नाही. त्याचप्रमाणे आपापसातील संघर्ष आणि विजयांना कोणतेही मूल्य नाही. एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीवर सहज विजय मिळवू शकते. परंतु या प्राणघातक विषाणूने दोघांनाही शरण यायला भाग पाडले आहे. म्हणून समानता आणि प्रत्येकाला समान हक्क ही मानवाला निसर्गाने सुपुर्द केलेली तत्त्वे आहेत, हे मान्य करावं लागेल.
प्रत्येकाला जगण्याचा समान अधिकार आहे यामध्ये कोणाचही दुमत नसावं. पण कोरोनामुळे हे पून्हा एकदा अधोरेखित झालं आहे. म्हणूनच लोकशाही हा एकमेव मार्ग आहे जेथे प्रत्येकाला समान अधिकार मिळतो.
मानवांच्या समानतेचा अर्थ असा होतो की, ही पृथ्वी आणि पृथ्वीवरील विपुल नैसर्गिक संसाधने सर्वांनी समान पद्धतीने सामायिक करुन घ्यावीत. यामध्ये कोणालाही विशेषत: खासगी कंपन्यांना त्यांचा नफा मिळवण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा गैरफायदा घेण्याची परवानगी दिली जाऊ नये. अशाप्रकारचं हे विकासाचं मॉडेल मनुष्याच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहे. कोरोना विषाणूच्या प्राणघातक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हे न टिकणार विकासाचं मॉडेल आहे.
सध्या कोणालाही देशाच्या विकास दराबाबत चिंता वाटत नाही. प्रत्येकजण आपापल्या जगण्याची काळजी करत आहे. या लॉकडाऊनच्या काळात मानवांनी केवळ मूलभूत गरजा पूर्ण करून जगणे शिकले आहे. यातुन घेतलेला एक चांगला धडा म्हणजे, सध्याच्या उपभोक्तावादी मॉडेलला केवळ मनुष्यांच्या मुलभूत गरजांची पूर्तता करणारे मॉडेल बनवणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी धावणाऱ्या मनुष्याने जगण्यापुरंत उत्पादन घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लोकांचं सहकार्य हे मानवी आत्म्याला मार्गदर्शन करण्यासाठी असायला हवे एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी नव्हे. या लॉकडाऊनच्या कालावधीत जर लोकं एकमेकांना मदत करण्यासाठी सरसावले नसते तर मानवतेचे काहीसं विपरित चित्र दिसलं असतं. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन याच अधारावर सर्व जागतिक धोरणं आखणे गरजेचे आहे.