नवी दिल्ली :या महिन्यात परराष्ट्र संबंधी तीन नव्या नियुक्त्या झाल्या. यावरून हेच दिसत आहे की चीनच्या भूभागातल्या तसेच पूर्वेकडच्या शेजारी सुरू असलेल्या विस्तारवादी हालचाली आणि अफगाणिस्तानात सुरू असलेला तालिबानचा वाढता हस्तक्षेप याला रणनीतीत्मक उत्तर म्हणून नवी दिल्लीने या नव्या नेमणुका केल्या आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव (आंतरराष्ट्रीय संघटना आणि समिट) विक्रम दोराईस्वामी यांना बांगलादेशातील भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जकार्तामधील असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स (एशियान) प्रादेशिक गटातील भारताचे दूत म्हणून काम करणारे रुद्रेंद्र टंडन यांची अफगाणिस्तानात नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयातले सहसचिव (अमेरिका) गौरांगलाल दास यांना तैवानमधील भारत-ताइपे असोसिएशनचे नवे महासंचालक म्हणून पाठवले जात आहे.
लडाखमधला चीनशी झालेला भारताचा रक्तरंजित सीमा संघर्ष, दक्षिण आशिया, दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्र इथे असलेला बीजिंगचा वर्चस्ववादी दृष्टिकोन आणि अफगाण शांतता प्रक्रियेमध्ये तालिबानचा वाढता हस्तक्षेप या पार्श्वभूमीवर या तीन नियुक्त्या महत्त्वाच्या ठरतात. दक्षिण आशियात आपले पाय रोवण्यासाठी बीजिंग ढाक्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतानाच १९९२ च्या तुकडीतले परराष्ट्र सेवा अधिकारी ( IFS ) दोरायस्वामी बांगलादेशला जाणार आहेत. भारताच्या पूर्वेकडच्या शेजाऱ्याच्या संरक्षण प्रकल्पाच्या मागे चीन जलदगतीने जात आहे. पेकुआ इथल्या कोक्सच्या बाजारपेठेत बीएनएस शेख हसीना पाणबुडी तळ विकसित करणे आणि बांगलादेशच्या नौदलाला दोन पाणबुडी देणे या गोष्टी चीनने केल्या.
नवी दिल्लीची आणखी एक चिंतेची बाब म्हणजे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) प्रकल्पाला परवानगी दिली आहे. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) हा पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताने बीआरआयचा भाग होण्यास नकार दिला आहे. जगभरातल्या अनेक सत्ता शी जिनपिंग यांच्या बीआरआयवर टीका करत आहेत. कारण याद्वारे चीन अनेक छोट्या देशांना कर्जाच्या विळख्यात अडकवत आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताचे बांगलादेशसोबत चांगले संबंध असले, तरीही ढाका बंगालच्या उपसागरात सागरी व्यवस्थापन योजनांमध्ये चीनला मदत करायला तयार झाला आहे.
भारताच्या चिंतेचे आणखी एक कारण म्हणजे बांगलादेशच्या राज्य वैद्यकीय संशोधन संस्थेने चीनच्या सिनोव्हाक बायोटेक लिमिटेडने विकसित केलेल्या कोविड १९ लशीच्या तिसर्या टप्प्याच्या चाचणीस मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी भारताला भेट दिली, तेव्हा नवी दिल्ली आणि ढाका यांच्यामध्ये सात करार निश्चित झाले आणि तीन प्रकल्पांवर एकत्र काम करण्याचे ठरले. तरीही या गोष्टी घडत आहेत.
या करारानुसार बांगलादेशची चित्तोग्राम आणि मोंगला बंदरे भारत आपल्या वाहतुकीसाठी वापरणार. विशेष करून ईशान्य भारतातून चालणाऱ्या जलवाहतुकीसाठी. भारतातल्या त्रिपुरामधला सोनामुरा आणि बांगलादेशच्या दौडकांती जलमार्गाच्या बांधकामासाठी नवी दिल्लीने ढाक्याला ८ अब्ज डाॅलर्स द्यायच्या वचनाचीही पूर्तता यावेळी झाली. दोन्ही देश जनतेसाठी आणि व्यापार मजबूत करण्यासाठी रेल्वे आणि इतर संपर्क सुविधांवर काम करत आहेत.
या तीन प्रकल्पांमध्ये बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात एलपीजी आयात, ढाक्यातले रामकृष्ण मिशनमध्ये विवेकानंद भवन ( विद्यार्थ्यांचे वसतीगृह ) आणि खुलनामधल्या आयडीईबी इथल्या बांगलादेश-इंडिया प्रोफेशनल स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट यांचा समावेश आहे. बांगलादेशमध्ये दोरास्वामी यांची राजदूत म्हणून झालेली नियुक्ती ही बीजिंगचा ढाक्याला आकर्षित करण्याच्या प्रयत्नाविरोधातली नवी दिल्लीची ही रणनीती मानली जाते. दोरास्वामी मण्डारिन आणि फ्रेंच सहज बोलू शकतात. त्यांनी नवी दिल्लीमधल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात संयुक्त सचिव म्हणून काम केले आहे. ते इण्डो – पॅसिफिकचे प्रमुख होते.