स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, “तुम्हाला जे वाटेल, तेच तुम्ही व्हाल. जर तुम्ही स्वतःला कमकुवत समजत असाल तर तुम्ही कमकुवत व्हाल, जर तुम्ही स्वत:ला बलवान समजत असाल तर तुम्ही बलवान व्हाल”, “तुम्ही गुलामासारखे नाही तर मालकासारखे काम करा, सतत काम करा, पण गुलामाचे काम करू नका”, “कधीही असे म्हणू नका की, नाही, मी करू शकत नाही, कारण आशा ही अनंत आहे”, “सर्व शक्ती तुझ्यात आहे. तू काहीपण करु शकतो".
तरुणांना त्यांच्या इच्छेनुसार कुठेही काहीही साध्य करण्यासाठी जन्मजात ऊर्जा, कौशल्ये आणि शक्ती आवश्यक असते. स्वामी विवेकानंद हे तरूणांचे खरे प्रेरणास्रोत आहेत आणि तरुण ही देशाची मोठी संपत्ती आणि कणा आहे असं ते नेहमी मानत. कोणत्याही देशाचे भवितव्य आपण युवकांचे पालनपोषण, प्रेरणा, शिक्षण आणि कुशलतेने हुशार आणि ज्ञानी मानव संसाधन कसे बनवतो यावर अवलंबून असते.
राष्ट्रीय युवा दिनNATIONAL YOUTH DAY: महान आध्यात्मिक नेते आणि तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ भारतातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांना अधिक कुशल, ज्ञानी आणि उपयुक्त मानवी संसाधनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो. भारत 1985 पासून स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा करतो. 1984 पासून, भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन (युवा दिवस) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. देशाच्या पुढे, जागतिक बदलांच्या संदर्भात युवकांच्या व्यावहारिक समस्या, सामर्थ्य, कमकुवतपणा आणि त्यांच्या उपजीविकेसाठीच्या आव्हानांचा आढावा घेणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून विशेष लक्ष वेधणे हा राष्ट्रीय युवा दिनाचा उद्देश आहे.
युवा क्षमता आणि सक्षमीकरण काळाची गरज : भारताची आर्थिक वाढ भारत आपल्या तरुणांचा विकास कसा करतो यावर अवलंबून आहे. लवचिक राष्ट्र उभारणीत तरुणांचा मोलाचा वाटा आहे. UN ने जगभरातील बहुतांश शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs), (17 SDGs) साध्य करण्यासाठी तरुणांना प्रमुख भूमिका सोपवली आहे. UN SDGs च्या 2030 च्या अजेंड्याची मशाल तरुणांच्या हाती आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. तसंच 2030 मध्ये 15-29 वयोगटातील 365 दशलक्ष युवकांसह भारत सर्वात तरुण देश असेल. भारताची जगात सर्वात मोठी संभाव्य तरुण लोकसंख्या आहे आणि सुमारे 808 दशलक्ष लोक (एकूण लोकसंख्येच्या 66%) 35 वर्षाखालील आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या राष्ट्रीय युवा धोरणात काही गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. प्रामुख्याने शिक्षणातील गुणवत्ता, असमानता कमी करणे, कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असावे आर्थिक वाढ होईल याची खात्री देणे याचा त्यात समावेश आहे.
तरुणांच्या समस्या : वर्ल्ड युथ रिपोर्ट (WYR) या अहवालात समस्या आणि कृती उद्दिष्टांच्या जागतिक कार्यक्रमासाठी वचनबद्धतेची तातडीची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. कारण अहवालानुसार सुमारे 200 दशलक्ष तरुण गरिबीत आहेत. 130 दशलक्ष तरुण निरक्षर आहेत. तर 88 दशलक्ष बेरोजगार आहेत आणि 10 दशलक्ष तरुण एचआयव्ही/एड्सने ग्रस्त आहेत. त्याचवेळी 500 दशलक्षाहून अधिक तरुण दिवसाला 2 डॉल पेक्षा म्हणजेच १६० रुपयांपेक्षा कमी वेतनावर उदरनिर्वाह करत आहेत. एवढेच नाही तर 113 दशलक्ष मुले शाळांमध्ये जात नाहीत. खरं तर ही मोठी आव्हाने आहेत. इतर काही समस्या म्हणजे शिक्षणासाठी मर्यादित प्रवेश, फायदेशीर रोजगार, नोकरीची सुरक्षितता, तंत्रज्ञानातील व्यत्यय, कौशल्य अद्ययावत करणे, लैंगिक समानता, कामावरील ताण, नैराश्य, शोषण, कामाचे समाधान नसणे आणि अशा बऱ्याच गोष्टी या अहवालात नमूद केल्या आहेत. कोणत्याही देशात बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे, नाही. फोर्ब्स इंडिया, (1 नोव्हेंबर 2023), सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE), नोव्हेंबर 2023 च्या आकडेवारीनुसार, भारतातील बेरोजगारीचा दर अलीकडच्या काळात उच्च पातळीवर पोहोचला आहे. प्रामुख्याने ग्रामीण क्षेत्रातील वाढत्या बेरोजगारीमुळे हा आकडा वाढला आहे. भारतातील एकूण बेरोजगारीचा दर जुलै 2023 मध्ये 7.95% होता, ऑक्टोबर 2023 मध्ये तो वाढून 10.05% झाला. CMIE नुसार, तरुणांना बेरोजगारीच्या समस्या भेडसावत आहेत. 2022-23 मध्ये तरुणांचा बेरोजगारीचा दर (15 - 24 वर्षे) 45.4% इतका होता. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
सेपियन लॅब सेंटर फॉर द ह्यूमन ब्रेन अँड माइंडच्या “Mental State of India: The Internet-enabled Youth” 2023 च्या अहवालानुसार, 2023 मध्ये सुमारे 51% तरुण व्यथित होते किंवा त्यांचा संघर्ष सुरू होता. हे असं सूचित करतं की त्यांच्यात मानसिक आरोग्याचा प्रश्न होता. भारतीय तरुणांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
तरुणांना आज नेमकी कशाची गरज आहे...
1) उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षित होण्यासाठी आणि आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांनी सुसज्ज होण्यासाठी तरुणांना अधिक काम करावे.
2) AI आणि ऑटोमेशन सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये कौशल्य अद्ययावत करणे हे जागतिक संधींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
3) तरुणांचे जीवन सुधारण्यासाठी विद्यमान शिक्षणाचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यावरही सरकारने भर दिला पाहिजे.