हैदराबाद - अमेरिकेतील माउंट सिनाई हेल्थ सिस्टीमने गुगल नेस्टबरोबर भागीदारी करून कोव्हिड १९च्या रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी व्हिडिओ व ऑडिओ तंत्रज्ञानाचा अद्ययावत वापर करण्यास सुरुवात केली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
कोव्हिड-१९ रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी फ्रंट लाइन नर्स रूग्णालयात वेगवेगळ्या विभागात बसविलेल्या शंभराहून अधिक नेस्ट कॅमेऱ्यांचा वापर करत आहेत.
“आताच्या काळात अनेक रुग्णालयांची गरज असलेली सुविधा प्रदान करण्यासाठी आणि आमच्याबरोबर भागीदारी करण्यासाठी आम्ही गुगलचे आभारी आहोत. आमच्या समोर असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी नेस्टची टीम आठवडाभर दिवसरात्र कार्यरत होती. यामुळे रुग्णांना सेवा देताना रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना उच्चस्तरीय सुरक्षा प्रदान करणे शक्य झाले आहे," असे माउंट सिनाई हेल्थ सिस्टीमचे डिजिटल आरोग्य विभागाचे वरिष्ठ संचालक सुदिप्तो श्रीवास्तव यांनी म्हटले.
विशिष्ट उद्दिष्ट लक्षात घेऊन निर्माण करण्यात आलेल्या नेस्ट कॅमेरा कन्सोलमुळे आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रुग्ण असलेल्या खोलीतून 'लाइव्हस्ट्रीमिंग' पहायला मिळते तसेच रुग्णांशी संवाद साधने देखील शक्य झाले आहे. एप्रिल महिन्यात न्यूयॉर्क शहरात कोव्हिड १९ने धुमाकूळ घातलेला असताना आणि त्याचा देशभर प्रसार होत असताना रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून रुग्णालय स्रोतांवर तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी रुग्णालयांना काहीप्रमाणात दिलासा देण्याच्या हेतूने गुगल नेस्टने माउंट सिना बरोबर भागीदारी करून कॅमेरा स्थापित करण्यास सुरुवात केली होती.
“या तंत्रज्ञानामुळे आमची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली आहे. यामुळे रुग्णांच्या खोल्यांमध्ये वारंवार जाण्याची गरज कमी झाली असल्याने आमची कार्यक्षमता सुधारून वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांचे (पीपीई किट) जतन करण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर नर्सिंग स्टेशनमध्ये बसून रुग्णांवर देखरेख ठेवता येत असल्याने त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात मोठी मदत झाली आहे, तसेच रुग्णांच्या खोलीमध्ये जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने कर्मचाऱ्यांची सुरक्षा देखील जपता येत आहे, ”असे माउंट सिनाई रुग्णालयातील क्लिनिकल इनोव्हेशन्सचे उपाध्यक्ष रॉबी फ्रीमन यांनी म्हटले आहे.