13 ऑगस्ट, 2020 रोजी संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि इस्त्राईल यांच्यात पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी व द्विपक्षीय संबंध सुरळीत करण्यासंबंधीचा अब्राहम करारकरण्यात आला. पश्चिम आशिया खंडातील संघर्षपूर्ण परिस्थीती निवळण्यासाठी या शतकातील पहिले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून याकडे पहिले जाऊ शकते. अरब -इस्त्रायली संबंधातील ताज्या घडामोडींमुळे इस्त्राईल आणि युएई या दोन्ही देशांचा निकटचा भागीदार असलेल्या भारताला पश्चिम आशियाई प्रदेशातील एक महत्त्वाचा देश म्हणून पुढे येण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे, बहुधा मागील सात दशकाहून अधिक काळासाठी तणावपूर्ण संबंध राहिलेल्या अरब आणि इस्त्राईलमध्ये शांतता करारावर आपला प्रभाव देखील पाडता येईल.
प्रगत विचारांचे नेते आणि युएईचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद अल नाह्यान आणि इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील करारात या क्षेत्राचे संपूर्ण राजकारण बदलण्याची क्षमता आहे. यासाठी अरब राष्ट्रांनी इस्त्राईलच्या स्वातंत्र्यतेचा हक्क मान्य करून एक राष्ट्र म्हणून मान्यता देऊन इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संवाद पुनर्प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे असले तरी पॅलेस्टाईनला राज्याचा दर्जा मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरीकडे, युएईचा प्रमुख प्रादेशिक सहयोगी सौदी अरेबियाने असे सूचविले आहे की पॅलेस्टाईन राज्य अस्तित्वात आले तरच तो या करारात सहभागी होण्याचा विचार करेल, यावरून रियाधला या सर्व घडामोडींमध्ये विचारात घेतले आहे असे मानण्याची शक्यता कमी आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे, या करारात पॅलेस्टाईन अॅथॉरिटीला (पीए) कोठेही धक्का पोचणार नाही, तसेच पॅलेस्टाईनच्या मुद्दय़ावरून इस्त्राईलला डी-हाइफनेट करण्यात येईल यावर भर दिला आहे. ज्यामुळे इजिप्त आणि जॉर्डन बरोबरच अरब देशांचे इस्त्राईलबद्दलचे मत बदलण्यास संधी मिळणार आहे.
जुलै 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राईलला भेट दिली तेंव्हाच भारताने डी-हाइफिनेशनची प्रक्रिया पूर्ण केली. स्वातंत्र्यांनंतर पहिल्यांदाच एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी इस्राईलचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी पॅलेस्टाईनला भेट दिली नाही, त्यामुळे दोन्ही देशांबद्दलचे भारताचे धोरण स्पष्ट झाले. तसेच, 1992 मध्ये दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी संबंध प्रस्थापित झाल्यापासून इस्राईलशी संबंध राखण्याचे भारताचे वैशिष्ट्य आणि धोरण देखील सुस्पष्ट झाले. हे वाढते द्विपक्षीय संबंध महत्त्वपूर्ण असून धोरणात्मकदृष्ट्या नैसर्गिक देखील आहेत. त्याचबरोबर, पॅलेस्टाईन लोकांशी एकता साधून संतुलन राखण्याचा देखीलप्रयत्न करण्यात आला.
अब्राहम करारात पॅलेस्टाईनकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांचे महत्व कमी केल्याची पॅलेस्टाईनची भावना आहे.कारण, इतके वर्षे पॅलेस्टाईनचे साथीदार असलेले देश आता मात्र अंतर राखत आहेत. यावर पॅलेस्टाईन नेमकी काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे बाकी आहे. परंतु, अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेला करार पॅलेस्टाईनने नाकारला आहे. तर, गेल्या २६ वर्षात इस्त्राईल आणि अरब जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये या कराराने मोठी प्रगती झाली आहे, असे इस्त्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हटले आहे. यातील सकारात्मक बाजू म्हणजे मागील काही काळापासून या प्रदेशातील अशांततेचे कारण बनलेल्या आणि पॅलेस्टाईन सातत्याने निषेध नोंदवत असलेल्या इस्त्राईलच्या साम्राज्यवादी योजनेला स्थगित द्यावी लागेल.