नवी दिल्ली :कोविड-१९च्या कारणास्तव मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद करताना मृत्यूचे नेमके कारण जसे की न्यूमोनिया, ह्रदयविकाराचा झटका किंवा रक्तप्रवाहात निर्माण झालेल्या गाठी असे स्पष्ट उल्लेख करण्याच्या सूचना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिल्या आहेत. जेणेकरून मृत्यूच्या नेमक्या कारणाची नोंद करण्यात येईल.
कोविड-१९ची महामारी संपूर्ण जगासाठी नवीन आहे. कोविडमुळे सर्व देश आणि समुदाय त्रस्त आहेत. अशावेळी भारतात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोरणे आखण्यास आणि कोविड-१९चा नेमका होणारा परिणाम लक्षात घेऊन त्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यासाठी मृत्यूचे नेमके कारण जाणून घेणे आवश्यक असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. जेणेकरून ही माहिती एकत्र करून एक डेटाबेस बनविता येईल. मृत्यूच्या नेमक्या कारणांची नोंद करताना ज्या रुग्णाची कोविड-१९ चाचणी करण्यात आलेली नाही परंतु त्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत ती नोंद 'संभाव्य कोविड-१९'मुळे झालेला मृत्यू अशी करण्यात यावी असे आयसीएमआरने म्हटले आहे.
ज्या केसेस मध्ये चाचणी अहवाल येणे बाकी आहे परंतु रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती अशा मृत्यूंची नोंद 'संशयित मृत्यू' म्हणून केली जाईल. तर चाचणी अहवाल निगेटिव्ह परंतु लक्षणे आढळून आलेल्या प्रकरणांमध्ये 'साथीच्या रोगाचे निदान' म्हणून नोंद करण्यात येईल अशा सूचना करण्यात आल्या आहेत. निदान निरीक्षणाचे सादरीकरण सौम्य ते गंभीर अशा स्वरुपाचे आहे आणि आजाराची तीव्रता, आजराचे स्वरूप आणि रूग्णाचे वय यावर ते अवलंबून असते.
आजार किंवा मृत्यूचा पॅटर्न लक्षात येण्यासाठी रुग्णांच्या रोगाची आणि मृत्यूच्या कारणांची प्रमाणित माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे जेणेकरून त्याच्या आधारे निरीक्षणे नोंदवून साथीच्या रोगाचे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूवर देखरेख ठेवता येईल. “कोविड-१९चे सार्वजनिक आरोग्यावर होणारे परिणाम मोजण्यासाठी आणि वेळेवर आवश्यक त्या आरोग्य उपाययोजना आखून समुदायाचे संरक्षण करण्यासाठी भारतातील प्रत्येक जिल्ह्यातून आणि राज्यांमधून प्रमाणित माहिती येणे आवश्यक आहे." “त्याच वेळी, लोकांवर परिणाम करणाऱ्या आरोग्याच्या इतर परिस्थितीवरही लक्ष ठेवले पाहिजे जेणेकरून आरोग्य यंत्रणा लोकांच्या गरजा भागविण्यासाठी तयार असेल,” असे सूचना पत्रात नमूद केले आहे. वैद्यकीय व्यावसायिक - डॉक्टरांनी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मुत्यूची नोंद करताना घटनाक्रमाचे स्वरूप कसे असावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये मृत्यूचे प्रत्यक्ष कारण, मृत्यूच्या पूर्वीचे लक्षणे आणि प्रत्यक्ष कारण, मृत्यूचे मूळ कारण आणि मृत्यू होतानाचे निरीक्षण अशा विविध गोष्टींचा समावेश यात करण्यात आला आहे. कोविड-१९ हे मृत्यूचे मूलभूत कारण आहे. ज्यामध्ये बहुतेक मृत्यूंमध्ये रुग्णांना न्यूमोनिया होतो.