जगातील सर्वात चैतन्यमय शहराचा किताब मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हैदराबादच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. संयुक्त राष्ट्रासोबत काम करणाऱ्या आर्बर डे फाऊंडेशनकडून हैदराबादचा 2020 या वर्षातील 'ट्री सिटी' म्हणून गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तेलंगणा सरकारच्या एक कोटी वृक्षांची पूजा करण्यासाठीच्या 'कोटी वृक्षर्चण' या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या शुभारंभानंतर दुसऱ्याच दिवशी शहराला हा बहुमान मिळाला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या वाढदिवसाला या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा बहुमान मिळविणारे हैदराबाद हे देशातील पहिले आणि एकमेव शहर ठरले आहे. शहरातील पर्यावरणप्रेमींमधून यावर आनंद व्यक्त केला जात आहे.
हरीत मोहिमेत सर्वांचा सहभाग
हरीत तेलंगणा या उपक्रमासाठी राज्यसभा खासदार संतोष कुमार यांनी पुढाकार घेत ग्रीन इंडिया चॅलेंज जुलै 2017 मध्ये सुरू केले. याच मोहिमेप्रमाणेच हरीत हरम आणि कोटी वृक्षर्चण मोहिमेसाठीही नागरिकांचा चांगलाच उत्साह बघायला मिळाला. राज्य सरकारने सुरू केलेल्या हरीत उपक्रमात सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनीही सहभाग नोंदविला. यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे ध्येय साध्य करणे शक्य झाले. राज्याच्या दीर्घकालीन हितासाठीचा हा एक मोठा यज्ञच आहे. पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही या मोहीमेचे दीर्घकालीन फायदे होणार आहेत. वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे जतन आणि संवर्धनासाठीही राज्य सरकारने चांगले धोरण आखल्यानेच हरीतक्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. हैदराबादला मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय बहुमानामुळे हरीत पट्टा वाढविण्याच्या दृष्टीने शहरांमध्ये निकोप स्पर्धेला चालना मिळणार आहे. नागरिकांच्या सक्रीय सहभागामुळेच हरीत भारताचे स्वप्न साकारणे आपल्याला शक्य होणार आहे.
प्रदुषणामुळे लाखो नागरिकांचा मृत्यु