सध्या महाभयंकर कोरोना विषाणू जगभरातील कोट्यवधी लोकांचा जीव घेत आहे. कोरोना विषाणू केवळ श्वसन प्रणालीवर हल्ला करतो, असे आपण मानत आलो आहोत. परंतु हा अंदाज बरोबर आहे का? कारण श्वसन प्रणालीसोबत कोरोना विषाणू डोळे, हृदय, यकृत, मेंदू आणि मूत्रपिंड यासारख्या इतर अवयवांवरही परिणाम करत आहे. लंडनमधील किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमधील प्रोफेसर अजय शहा म्हणाले की, या विषाणूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण आणि परिणाम हे पूर्वीच्या अनुमानांपेक्षा वेगळे आहेत. त्यांनी रूग्णालयात दाखल झालेल्या असंख्य कोरोना रुग्णांच्या लक्षणांची तपासणी केल्यानंतर ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत. कोरोनाची लक्षणं न आढळणाऱ्या रुग्णांव्यतिरिक्त, कोरोनामुक्त झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये हा विषाणू पुन्हा नव्याने सापडला आहे. ‘द टेलीग्राफ’ने या संदर्भातील नवीन निष्कर्ष प्रकाशित केले आहेत.
कोरोना विषाणूंच्या कणांना आकर्षित करण्याची क्षमता नाकाच्या स्नायुत सर्वाधिक असते. सुरुवातीला हा कोरोना विषाणू काहीकाळ नाकपुड्यांमध्ये राहतो. या काळात रुग्णाची वास घेण्याची क्षमता गमावू शकते. त्यानंतर हा विषाणू हळूहळू अनुनासिक पोकळीतून घशात प्रवेश करतो. एसीई २ या स्नायूवर कोरोना विषाणू आपला निवास करतात; तसेच घशातील पातळ, चिकट पडद्यासारख्या त्वचेत घट्टपणे चिटकून बसतात. अशा त्वचेच्या पृष्ठभागावरील प्रथिने जेव्हा पेशींशी आपापसात क्रिया करत असतात तेव्हा हा विषाणूही या क्रियेत सहभागी होतो. आणि या विषाणूची पुनरावृत्ती होऊ लागते. या काळात रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळत नाहीत. मात्र असा रुग्ण इतर निरोगी लोकांना संक्रमित करू शकतो. जेव्हा हा विषाणू घशात प्रवेश करतो तेव्हा जर आपली रोगप्रतिकार यंत्रणा या विषाणूचा प्रतिकार करण्यात अयशस्वी झाली तर हा विषाणू आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतो.
एकदा का हा विषाणू वायुमार्गाद्वारे पुढे सरकला, की त्या विषाणूचा स्फोट व्हायला लागतो. आणि हे विषाणूजन्य प्रथिने एसीई 2 रिसेप्टर्सद्वारे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये जातात. त्यामुळे फुफ्फुसात जळजळ होते आणि श्वास घेण्यासही त्रास होतो. यामुळे ‘न्यूमोनिटिस’ (Pneumonitis) नावाची स्थिती उद्भवते. यामुळे श्वसन स्नायू सूजतात आणि त्याच वेळी फुफ्फुसांमध्ये एक प्रकारचा द्रव गोळा होतो. तर काही रुग्णांना तीव्र श्वसनाचा त्रास होतो ज्याला आपण ‘एआरडीएस’ (Acute Respiratory Distress Syndrome) म्हटले जाते. त्याचबरोबर रक्तातील ऑक्सिजनची पातळी धोकादायक पातळीपर्यंत कमी होते. या टप्प्यावर रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. परंतु या टप्प्यावर विषाणूचा प्रसार आपण रोखू शकत नाही. त्यानंतर व्हेंटिलेटरने यांत्रिक श्वासोच्छ्वास देणे चालू ठेवून आपण केवळ रुग्णामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणाद्वारे कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याची वाट पाहू शकतो.
या अवस्थेत रुग्णाची रोगप्रतिकार यंत्रणा अतिरेकी पद्धतीने प्रतिसाद देते. त्याचबरोबर इम्यूनोग्लोबुलिन (Immunoglobulins) रुग्णांच्या पेशींवर हल्ला करते. अशा प्रकारचे निरिक्षण शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. या टप्प्यावर रुग्णाचे संपूर्ण शरीर फुगते आणि हृदयाचे ठोके वेगवान होतात. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होते. सुमारे २० टक्के रुग्णांना मुत्रपिंडाचा त्रास होतो. तसेच शरिरात होणाऱ्या वेगवान हलचालीमुळे हृदयावर ताण निर्माण होतो. आयसीयूमध्ये असणाऱ्या रुग्णाचे एकापेक्षा जास्त अवयव निकामी होऊन मृत्यू होण्याची हीच कारणे आहेत.
“काही रूग्णांच्या निरीक्षणावरून लक्षात आले की, बरेच रुग्ण हॉस्पिटलमध्ये येताना गोंधळलेल्या अवस्थेत असतात किंवा काहीजण आत आल्यानंतर गोंधळात पडतात. मुळात ही लक्षणं मेंदूत काहीतरी गडबड असल्याची आहेत. विषाणूचा थेट मेंदूवर परिणाम होतो की नाही, किंवा रक्तातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचं हे लक्षण आहे. याबद्दल काहीही खात्रीपूर्व सांगता येणार नाही.”