हैदराबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एच-१बी व्हिसा वर्षभरासाठी रद्द करण्याची घोषणा केली. अमेरिकेतील लोकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हजारो भारतीयांचे नुकसान होणार आहे.
एच-१बी व्हिसा म्हणजे काय?
एच-१बी व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे, ज्याद्वारे अमेरिकेतील कंपन्या बाहेरच्या देशांमधील एखाद्या विषयातील तज्ज्ञांना कामावर ठेवण्याची मुभा मिळते. या प्रकारच्या व्हिसाची सुरुवात १९९०मध्ये करण्यात आली. अमेरिकेतील कंपन्यांमध्ये संशोधन, अभियांत्रिकी आणि कम्प्युटर प्रोग्रामिंगसाठी तंत्रज्ञाची आणि तज्ञ कामगारवर्गाची भासणारी कमतरता पाहता, परदेशातील व्यक्तींना कामावर रुजू करण्याच्या उद्देशाने हे सुरू करण्यात आले होते.
कोणावर होणार परिणाम..?
या व्हिसाचा सर्वाधिक फायदा भारतीयांना होतो आहे. वर्षभरात अमेरिका जेवढे एच-१बी व्हिसा देते, त्यांपैकी ७० टक्के हे भारतीयांना मिळतात.
एकूण एच-१बी व्हिसांपैकी ६५हजार व्हिसा हे परदेशात उच्चशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांना मिळतात, तर बाकी हे अमेरिकेत उच्चशिक्षण घेतलेल्यांना मिळतात.
सध्या अमेरिकेत तीन लाखांहून अधिक भारतीय एच-१बी व्हिसावर काम करत आहेत.