नवी दिल्ली : गुजरातमध्ये निवडणुका होणार असतानाच मोरबी पूल दुर्घटना घडली. भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला या घटनेने मोठा धक्का बसला. या अपघातात 135 जणांचा मृत्यू झाला होता. मोरबी हे सौराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्र आहे. मोरबी आणि आसपासच्या परिसरात पटेलांचे वर्चस्व आहे. भाजप गेल्या काही काळापासून पटेल समाजाला खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे याच समाजातून आलेले आहेत. (Gujrat Election 2022) (Gujrat Election phase one).
पहिला टप्पा भाजपसाठी महत्त्वाचा : उद्या म्हणजेच १ डिसेंबरला राज्यात पहिल्या टप्प्याची निवडणूक होणार आहे. उद्या 182 पैकी 89 जागांवर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबर रोजी ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. मोरबी दुर्घटना, अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर, 'आप'ची एन्ट्री या सगळ्यांचा निवडणुकीवर किती परिणाम झाला, हे 8 डिसेंबरला मतमोजणी झाल्यावरच कळेल. त्यामुळे पहिला टप्पा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
भाजपची नजर सौराष्ट्रावर : पहिल्या टप्प्यात सौराष्ट्रात निवडणुका होत आहेत. या भागात काँग्रेस परंपरागतपणे मजबूत आहे. 2017 मध्येही काँग्रेसने येथे चांगली कामगिरी केली होती. काँग्रेसने येथे 48 पैकी 28 जागा जिंकल्या होत्या. 2012 च्या तुलनेत काँग्रेसला येथे 13 जागा अधिक मिळाल्या होत्या. तेव्हा काँग्रेसला येथे केवळ 15 जागा मिळाल्या होत्या. मात्र नंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. असे असूनही 2017 मध्ये पटेल समाज ज्या प्रकारे भाजपपासून 'वेगळा' झाले, त्याचा पक्षावर गंभीर परिणाम झाला. जर हा कल बदलला नाही, तर यावेळी भाजपला आणखी मोठा धक्का बसू शकतो. भाजपने सौराष्ट्रात पक्ष मजबूत करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यांनी येथील पटेल नेत्यांना पक्षात स्थान दिले आहे. तसेच अनेक योजना सुरू केल्या आहेत. या भागात काँग्रेसचे तगडे नेते भाजपात सामिल झाले आहेत. येथील काही जागांवर पोटनिवडणूक झाली, त्यातही भाजपचा विजय झाला आहे. मात्र 2017 चा ट्रेंड आटोक्यात आणण्यात सौराष्ट्रातील भाजप अपयशी ठरला, तर राज्यात त्याचा फटका सहन करण्याची तयारी पक्षाने ठेवावी. भाजपला हे नुकसान भरून काढणे कठीण होईल. दुसऱ्या टप्प्यात उत्तर, मध्य आणि आदिवासी बहूल भागात निवडणुका होणार आहेत. म्हणजेच भाजपला एकंदरीत राज्यात चांगली कामगिरी करायची असेल तर सौराष्ट्रातही चांगली कामगिरी करावी लागेल.