महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

EXCLUSIVE : 'बॉयकॉट मेड इन चायना' मोहीमेबाबत सोनम वांगचुक यांची विशेष मुलाखत.. - बॉयकॉट चायना मोहीम विशेष

आमिर खानच्या थ्री-इडियट्स सिनेमामधील 'फुंगसुक वांगडू'ची प्रेरणा असलेले सोनम वांगचुक यांनी ईटीव्ही भारतशी चर्चा केली. चीन सध्या भारतात करत असलेली घुसखोरी, आणि त्याला उत्तर म्हणून आपण चीनी वस्तूंचा वापर टाळण्याचे करत असलेले आवाहन याबाबत त्यांनी चर्चा केली. पाहूयात त्यांची ही विशेष मुलाखत...

EXCLUSIVE: Innovator Sonam Wangchuk on #BoycottMadeInChina
EXCLUSIVE : 'बॉयकॉट मेड इन चायना' मोहीमेबाबत सोनम वांगचुक यांची विशेष मुलाखत..

By

Published : Jun 11, 2020, 3:21 AM IST

नवी दिल्ली - आमिर खानच्या थ्री-इडियट्स सिनेमामधील 'फुंगसुक वांगडू'ची प्रेरणा असलेले सोनम वांगचुक यांनी ईटीव्ही भारतशी चर्चा केली. चीन सध्या भारतात करत असलेली घुसखोरी, आणि त्याला उत्तर म्हणून आपण चीनी वस्तूंचा वापर टाळण्याचे करत असलेले आवाहन याबाबत त्यांनी चर्चा केली. पाहूयात त्यांची ही विशेष मुलाखत...

प्रश्न : ‘वॉलेट विरुद्ध बुलेट’ची कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली?

उत्तर : लडाखमध्ये राहत असल्याने मी कायमच चीनची असभ्यता तसंच वर्चस्व म्हणा किंवा घुसखोरी, बघत आलो आहे. लडाखमधील लोकांना यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषतः मेंढपाळ लोक, जे दररोज आपल्या शेळ्या चरायला नेतात. त्यांच्या जमिनी कमी होत चालल्या आहेत (कारण, तेथे चिनी आक्रमण होत आहे.) मला असे वाटत होते की, यासंदर्भात काहीतरी करणे आवश्यक आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी जेव्हा पुन्हा घुसखोरी केली, तेव्हा माझ्या लक्षात आले की, यावेळी त्यांची योजना आणि हेतू वेगळा आहे. यावेळी सीमेचे उल्लंघन हा एकच उद्देश त्यांचा नव्हता. कोरोनासारख्या महामारीचा सामना करणारा कोणताही देश असे करणार नाही. असे लक्षात आले की, व्हिएतनाम, तैवानपासून ते अमेरिकी नौदलापर्यंत दक्षिण चिनी समुद्रातील सर्वांनाच चिथावणी दिली जात आहे. यावरुन, चीनकडून होणाऱ्या या सर्व कारवायांमागील कारण वेगळेच आहे, असे लक्षात येते. कारण, हे सगळे महिनाभराच्या कालावधीत घडले आहे. आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, आपल्या अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी ते असे करीत आहेत. कारण सरकारला महामारी यशस्वीपणे हाताळता आली नाही आणि यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. परिणामी, तेथील लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून, लोकांचे लक्ष वळविण्यासाठी ते असे करत आहेत. आता आपण हे समजून घ्यायला हवे की, जर आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी चीन असे करत आहे, तर आपण त्यांच्या अर्थव्यवस्थेवरच हल्ला करायला हवा. आपण त्यांच्या जाळ्यात अडकून त्यांना बंदुका आणि गोळ्यांनी प्रत्युत्तर देता कामा नये. जर त्यांना अर्थव्यवस्था कमकुवत होण्याची भीती असेल, तर त्यांच्या अर्थव्यवस्थेवरच का हल्ला करु नये. म्हणून मी असे म्हणाले की, भारतातील लोकांनी करायला हवे आणि ते आपले पाकीट म्हणजे वॉलेटद्वारे करता येईल. तुम्ही मोबाईलवरुन अॅप काढून टाकू शकता आणि कुठेही बसून, तुमच्या घरी, शहरात किंवा गावात हे पाकीट वापरु शकता. नुसते ऐकायला तर ही गोष्ट साधी वाटते, पण जर ही मोठ्या प्रमाणात घडली, म्हणजे लाखो किंवा कोट्यवधी अ‌ॅप्स मोबाईलवरुन काढून टाकण्यात आले, तर त्यांना सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची भीती आहे त्याचाच सामना करावा लागेल. अर्थव्यवस्था अधिक कमकुवत होत गेल्यास चीनमधील लोकांचा असंतोष वाढीस लागेल.

EXCLUSIVE : 'बॉयकॉट मेड इन चायना' मोहीमेबाबत सोनम वांगचुक यांची विशेष मुलाखत..

प्रश्न : परंतु एक प्रश्न आहे. केवळ भारतातच नाही तर संपुर्ण जगभरात चिनी उत्पादने ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत, चिनी वस्तू आणि अ‌ॅप्सवर बहिष्कार घालणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य आहे का? ही गोष्ट अशक्य नाही, मात्र निश्चितच अवघड आहे.

उत्तर : हो, हे अवघड आहे पण अशक्य नाही. मी नेहमीच म्हणतो, की या जगात अनेक गोष्टी अवघड आहेत. मुस्लिमांसाठी दारु न घेणे अवघड, शिखांसाठी तंबाखू न घेणे अवघड आहे, हिंदू लोक गोमांस खात नाहीत, तेही अवघड आहे. सगळंच अवघड आहे, परंतु ते गोमांस खात नाहीत, दारु पित नाहीत आणि तंबाखू खात नाहीत. जैन समुदायातील लोक कांदा, लसूण आणि गाजरदेखील खात नाहीत, तरीही ते आयुष्य जगतात. म्हणून, एखाद्याने दृढनिश्चय केला, तर काहीही अवघड नाही. परिस्थिती त्यानुसार बदल होत जातो. जैन समुदायाला ते जिथे जातील तिथे त्यांचे अन्न मिळते. व्हेगन (प्राण्यांपासून तयार झालेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन न करणारे लोक) लोकांना व्हेगन होता येते आणि शाकाहारी लोकांची इच्छा असेल तर त्यांना शाकाहारी अन्न मिळवता येते. जर आपण या सगळ्या ‘अडचणींची’ एकत्र तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की, भारत-चीन सीमेवरील जवान गोठवणाऱ्या थंडीत सीमेचे रक्षण करत ज्या अडचणींचा सामना करतात, त्या अडचणींची तुलना चिनी अ‌ॅप काढून टाकल्याने येणाऱ्या अडचणीशी होऊ शकत नाही. अ‌ॅप काढून टाकल्याने तुम्हाला जी अडचण येत आहे, ती त्यांना येणाऱ्या अडचणींच्या तुलनेत काहीच नाही. जर तुम्ही साधं अ‌ॅपदेखील काढून टाकू शकत नसाल, तर यावर मी काय म्हणू शकतो?

प्रश्न : सामान्य भारतीयांच्या ‘चलता है’ मानसिकतेचा तुम्हाला त्रास होतो का?

उत्तर :हो, मला या निष्काळजी मानसिकतेचा प्रचंड संताप येतो. जर देश म्हणून आपल्या अधोगतीचे काही कारण असेल, तर ही ‘चलता है’ मानसिकता असेल. ही एक गोष्ट आहे जी आपण चिनी लोकांकडून शिकण्यासारखी आहे. माझे असे निरीक्षण आहे की, ते लोक दररोज ज्या गोष्टी करतात त्याबाबत ते अत्यंत सावध असतात आणि यामुळेच शेवटी ते यशस्वी होतात. दुसरीकडे, आपल्या बाजूने सीमेवर कायम उत्साहाचा अभाव दिसून येतो. लॉकडाऊननंतर लोक ज्याप्रकारे वागत आहेत, त्यावरुनही हे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात आपण विषाणूला ज्या पद्धतीने हाताळले आहे, त्यासाठी जागतिक स्तरावर आपले कौतुक करण्यात आले. परंतु या ‘चलता है’ मानसिकतेमुळेच या प्रतिष्ठेला धक्का लागण्याची शक्यता आहे. जर आपण आवश्यक काळजी घेतली नाही, तर कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत भारताचा पराभव होईल. जर भारतीय लोक वेगाने विषाणूला बळी पडू लागले, तर आपण चीनची समस्या कशी हाताळणार? दुसरीकडे, चिनी नागरिकांमध्ये कायम जबाबदारीचे भान दिसून येते. हेच मुख्य कारण आहे ज्यामुळे चीनला विषाणूला नियंत्रित करणे शक्य झाले. ही गोष्ट चीनकडून शिकण्यासारखी आहे. या लढाईत काही आशा टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्याला शिस्त लावून घ्यायला हवी.

प्रश्न : चीनमधून आपल्याकडे सुमारे ५ लाख कोटींची आयात केली जाते आणि यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाटा ४१ टक्के आहे. तुम्ही चीनऐवजी दुसऱ्या देशांमधून आयात करण्याचा सल्ला द्याल का? कारण उत्पादनाचा अभाव असल्यामुळे सध्या यासाठी देशांतर्गत स्तरावरील उत्पादनाचा पर्याय शक्य दिसत नाही.

उत्तर : खरोखर. आपण शक्य आहे तेवढे देशांतर्गत स्तरावर उत्पादन करुन या उत्पादनांची गरज भागवण्याचा प्रयत्न करायला हवा. याशिवाय, ज्या गोष्टी देशात तयार होणे शक्य नाही त्याची इतर देशांकडून आयात करता येईल. जे देश मानवाधिकार, पर्यावरणीय नियमांचे पालन करतात आणि भारताविषयी त्यांचा एकूणच दृष्टिकोन चांगला आहे, जे आपल्याशी गैरवर्तन करीत नाहीत, अशा देशांकडून आपण आयात करायला हवी. चिनी उत्पादने स्वस्त आणि आणि अधिक स्पर्धात्मक असण्याचे कारण म्हणजे तेथे मानवाधिकार आणि श्रमिक कायद्यांचे उल्लंघन केले जाते. म्हणून, त्यांच्याकडे श्रम(लेबर) अतिशय स्वस्त असल्याचे दिसते. त्यांना पर्यावरण किंवा श्रमिकांविषयी कसलीही आस्था नाही. दोन्हीचे जेवढे शक्य आहे, तेवढे शोषण तिथे केले जाते. याशिवाय, बनावट गोष्टींचा विषय असो वा चलन गैरव्यवहार त्याबाबतीत ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे आणि या सर्व गोष्टींमुळेच त्यांच्या वस्तू स्वस्त असतात. त्यामुळे, आपण ही गोष्ट स्वतःलाच विचारायला हवी की, केवळ आंतरराष्ट्रीय समुह नाही तर त्यांच्या स्वतःच्या लोकांविषयी असलेल्या चीनच्या अशा मानसिकतेस प्रोत्साहन देणे योग्य आहे का.

पर्यावरण आणि श्रमिकांचे पराकोटीचे शोषण करुन या वस्तू तयार होतात. इतर अनेक अनैतिक गोष्टींव्यतिरिक्त या वस्तूंवर बहिष्काराचे हेही एक कारण आहे. आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपला विरोध चिनी लोकांना नाही तर चिनी सरकारला आहे. जर सरकारने त्यांच्या लोकांना मुक्त केले आणि प्रजासत्ताक राज्य स्थापन केले, तर आपण या भूमिकेवर पुनर्विचार करु शकतो आणि असा बहिष्कार न घालता आपले संबंध पुर्ववत करु शकतो.

EXCLUSIVE : 'बॉयकॉट मेड इन चायना' मोहीमेबाबत सोनम वांगचुक यांची विशेष मुलाखत..

प्रश्न : तुम्ही भारतातील लोकांना जो बहिष्कार घालण्यासाठी आवाहन केले आहे, तसेच आवाहन तुम्ही भारतीय कंपन्यांनादेखील कराल का?

उत्तर : पहिल्यांदा मी भारतीय लोकांना आवाहन करतो. जेणेकरुन ते या लढाईचा सामना करतील आणि या लहानशा गैरसोयीवर मात करतील. त्यानंतर, मी भारत सरकार, मोठे उद्योजक आणि व्यापारांकडे वळणार आहे. त्यांना देशांतर्गत स्तरावर तयार झालेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची विनंती करणार आहे.

प्रश्न : चीनमधून आपल्या देशात भरघोस गुंतवणूक केली जाते. काही दिवसांपुर्वी, भारताने चीनमधून येणाऱ्या परकीय गुंतवणूकीचे नियंत्रण आणि मूल्यमापन करण्यासाठी काही नियामक पावले उचलली आहेत. तुम्हाला असे म्हणाल का, तुम्ही सुचविलेल्या उपाययोजना सरकारने आधीच केल्या आहेत?

उत्तर : जर देशांतर्गत स्तरावर उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून अशी पावले उचलण्यात आली आहेत, तर माझ्यादृष्टीने ही कौतुकास्पद बाब आहे. माझे आवाहन हे पुर्वनियोजित पाऊल नव्हते, चिनी लोकांकडून भारताची प्रतिष्ठा आणि सार्वभौमत्वाचे होत असलेले उल्लंघन पाहून माझ्या मनातून हे आवाहन केले आहे.

प्रश्न : तुम्हाला असे वाटते का, सध्या अस्तित्वात असलेली पाणीटंचाई आणि पँगाँग त्सो तलावाच्या रुपाने स्वतःकडे अधिक जलस्त्रोत खेचून आणण्यासाठी चीन सरकारकडून ही पावले उचलण्यात येत आहेत?

उत्तर : कदाचित त्यांचा डोळा तलावावर नाही तर तलावाला मिळणाऱ्या जलस्त्रोतांवर असावा. आपण जागरुक राहून आक्रमक पवित्रा कायम राखायला हवा. जरी त्यांनी माघार घेतली, तरीही ते (चिनी सैन्य) वर्षभरानंतर परत येतील किंवा येणार नाहीत. १९६२ साली आपल्याकडून घेण्यात आलेली जमीन परत करण्याची मागणी आपण करायला हवी आणि १९६२ पुर्वी दोन्ही देशांची जी परिस्थिती होती ती मूळपदावर यायला हवी.

EXCLUSIVE : 'बॉयकॉट मेड इन चायना' मोहीमेबाबत सोनम वांगचुक यांची विशेष मुलाखत..

प्रश्न : ईटीव्ही भारतच्या कोट्यवधी वाचकांना तुम्ही काय संदेश द्याल?

उत्तर : आपल्या देशाचा अभिमान असणाऱ्या कोणत्याही नागरिकाला असे वाटेल, की आपल्या देशातील अर्थव्यवस्थेची भरभराट व्हावी. जागतिकीकरणाच्या नावाखाली आपण चमचे, ब्रेड आणि बटरसारखी साधी उत्पादने इतर देशांकडून आयात करीत आहोत. आपण देशांतर्गत उत्पादन आणि पर्यावरण सुधारण्यावर भर द्यायला हवा. पर्यावरणासाठी अनुकूल असणारे ‘ग्लोबलाईज्ड जग’ निर्माण करण्याचा प्रयत्न असायला हवा.

मी केवळ भारतीय नागरिकच नाही तर जगभरातील सर्व देशांमधील नागरिकांना हे आवाहन करु इच्छितो. मी तुमच्या सर्व वाचकांना विनंती करतो की, माझा “हेल्प मी चेंज चायना” असे आवाहन करणारा हा व्हिडिओ शेअर करावा आणि संपुर्ण जगातील नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा, जेणेकरुन चीनवर अधिक प्रमाणात आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण होईल. तुम्ही सारे ‘वॉलेट जवान’ आहात. आपल्या कर्तव्याचे पालन करा.

ABOUT THE AUTHOR

...view details