हैदराबाद - कोविड-१९ या साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यात आपण सगळे एक देश म्हणून, समाज म्हणून आणि व्यक्ती म्हणून कुठे कमी पडलो? कुठे चुकलो? या प्रश्नाचे काही उत्तर दिले गेलेले नाही. सध्याच्या काळात सर्व आरोग्याच्या पायाभूत सुविधा कोलमडून पडल्यानंतर, या प्रश्नांनी फारसा फरक पडत नाही.
कोविड काळात धुरा सांभाळणाऱ्या सर्व आत्मसंतुष्ट व्यक्ती जणू उत्साहाच्या घोड्यावर स्वार झाल्या. तेव्हा या विषयात तज्ज्ञ असलेले डॉक्टर्स वेळोवेळी सावधानतेचा इशारा देत होते. कोविडच्या पहिल्या लाटेनंतर तथाकथित यश साजरे करणारे हे वैद्यकीय व्यवसायातील नव्हतेच. २१ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेने या महामारीच्या मध्यातच निवडणुका घेतल्या. निवडणुका घेणारा हा पहिला देश होता. पण, त्यापासून १.३ अब्ज लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाने प्रेरणा घ्यायला नको होती.
भारतात कोविड-१९ ची पहिली लाट असतानाच बिहारमध्ये निवडणुका झाल्या. आजच्यासारखी गंभीर परिस्थिती नसली तरीही बराचसा निवडणूक प्रचार हा व्हर्च्युअल, ऑनलाइन केला गेला. एकापाठोपाठ येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मोफत लसीकरण हे आश्वासन दिले गेले. पण आपल्या देशात लोकसंख्येच्या अत्यल्प भागातही लसीकरण झाले नसताना, भारताने लसी इतर देशांना दान केल्या. यामुळेच इथे मोठा अनर्थ ओढावला. या एका चुकीच्या वेळच्या मानवतेची फार मोठी किंमत चुकवावी लागत आहे. दररोज ३ लाखाहून जास्त लोक पाॅझिटिव्ह होत आहेत आणि स्मशानभूमीत मृतदेहांचे ढीग लागत आहेत.
या भयंकर स्थितीपासून तीन गोष्टी वाचवू शकतात. त्या म्हणजे मास्क, सामाजिक अंतर आणि लसीकरण. आता अनेक लोक मास्क वापरतात. पण लसीकरणासाठी, त्यासंदर्भातल्या घटकांनी युद्धपातळीवर काम सुरू केले पाहिजे. जोपर्यंत जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत लोक स्वत:च्याच जबाबदारीवर आहेत. त्यांचा धोका कायम आहे.
देशात रोज कोरोना रुग्ण वाढत आहेत, हे अतिशय भयावह आहे. त्यातून भीतिदायक हे आहे की, तज्ज्ञांनी सांगितले आहे की अजून कोरोनाचा अत्युच्च काळ यायचा आहे. संसर्गाची तीव्रता वाढेपर्यंत, आम्ही आशा करतो की आरोग्याच्या पायाभूत सुविधा चांगल्या होतील, विशेषत: ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा वाढवला जाईल.