नवी दिल्ली :कोविड-१९ महामारीचा उद्रेक झाल्यापासून जगभरातील बहुतेक देशातील आरोग्यसेवा क्षेत्रातील संसाधने आणि फ्रँटलाईन कामगार प्रामुख्याने कोविड-१९ ला हाताळण्यासाठी कार्यरत आहेत. यामध्ये नागरिकांची डोअर-टू-डोअर टेस्टिंग असो वा कोविडला आटोक्यात आणण्यासाठीचे इतर सर्व कामांसाठी हे कामगार कार्यरत आहेत. यामुळे अगोदरच कमकुवत आणि मोडकळीस आलेल्या आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांवर ताण येऊन त्याचा गर्भवती मातांच्या आरोग्यविषयक प्रश्नासह इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर परिणाम होणे स्वाभाविक आहे.
लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य सेवांवर परिणाम झाल्याने कोविड-१९ प्रकोपच्या प्रारंभी गर्भवती माता आणि नवजात बालकांच्या मृत्युदरांमध्ये तीव्र वाढ नोंदविली गेली. 'युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड'च्या (यूएनएफपीए) अंदाजानुसार अचानक उद्भवलेल्या कोविड संकट काळात पुरेशी काळजी न घेतल्याने किमान ७० लाख अनपेक्षित किंवा विना नियोजित गर्भधारणा झाल्या आहेत. मात्र, आरोग्य सेवेअभावी असुरक्षित गर्भपात आणि बालकाच्या जन्मादरम्यान गुंतागुंत निर्माण होऊन उपचार न मिळाल्याने हजारो मृत्यू झाले आहेत.
युनिसेफच्या म्हणण्यानुसार मार्च ते डिसेंबर दरम्यान भारतात २० लाख बालकांचा जन्म होणे अपेक्षित आहे, जो जगाच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. दरम्यान या काळात जन्मलेल्या बालकांना आणि गर्भवती महिलांना आवश्यक ती आरोग्य सुविधा न मिळाल्याने त्यांना आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होऊ शकतात असा इशारा युनायटेड नेशन्स चाइल्ड फंडने (युनिसेफ) दिला आहे. याचाच अर्थ असा की, भारताला कोविड-१९ चा सामना करत असतानाच मातृस्वास्थ्याच्या संदर्भातील गर्भधारणेचे वेळेवर निदान, माता आणि बालमृत्यू दर इत्यादी प्रश्नांकडे लक्ष देऊन तातडीने निराकरण करणे आवश्यक आहे.
कोविड-१९च्या संकटकाळात आरोग्य संसाधनांचा अभाव लक्षात घेऊन गर्भवती महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारताला सर्वसामावेशी तांत्रिक उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. देशाच्या विविध भागात या अगोदरपासूनच काही नाविन्यपूर्ण उपाय अवलंबिले जात आहेत. उदाहरणार्थ, अपर्णा हेगडे यांनी विकसित केलेले 'आरोग्य सखी' नावाचे मोबाइल अॅप महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना मदत करत आहे. विशेष म्हणजे अपर्णा या स्त्रीरोगतज्ज्ञ देखील नाहीत. ‘आरोग्य सखी’ अॅपद्वारे 'आशा' कर्मचारी ज्या महिलांना रुग्णालयाची सोय उपलब्ध नाही अशा महिलांना गर्भ निदान आणि प्रसवपूर्व सुविधा प्रदान करू देते. याशिवाय, नवजात शिशु आणि माता मृत्युदर जास्त असलेल्या राजस्थान आणि मध्य प्रदेशात हे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्यसेवा पुरविणाऱ्यांना मदत करण्यासाठी 'अलायन्स फॉर सेव्हिंग मदर्स अँड न्यूबॉर्न (आस्मान)' हा डिजिटल प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानातील नवीन परिवर्तनाचे उत्तम उदाहरण आहे.