नवी दिल्ली :दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या यूके-इंडिया टेक भागीदारीच्या अनुषंगाने ब्रिटनने सोमवारी कोविड -१९ आणि हवामान बदल अभ्यासासाठी शिक्षण व उद्योग क्षेत्रातील संशोधकांसाठी ३ मिलियन पौंडाचा इनोव्हेशन चॅलेंज फंड जाहीर केला. दिल्ली येथील ब्रिटीश उच्चायोगाने जारी केलेल्या निवेदनानुसार, कोविड -१९ विरोधात लढा देणाऱ्या किंवा ग्रीन प्लॅनेटला बढावा देणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित आणि कर्नाटकातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) डाटा क्लस्टरशी संबंधित आणि महाराष्ट्रातील फ्युचर मोबिलिटी क्लस्टरशी संबंधित टेक इनोव्हेटर्सना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“२.५ लाख पौंडापर्यंतची किमान १२ ग्रँट्स / अनुदान दिले जाणे अपेक्षित आहे,” असे उच्च आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे. अर्जदारांना आंतरराष्ट्रीय- सदस्यासमवेत शैक्षणिक -औद्योगिक आधारित प्रोजेक्ट्स प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे.
आपली संकल्पना दोन पानी नोट्समध्ये सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. "ब्रिटन आणि भारताला नावीन्य आणि संशोधनाचा समृद्ध असा इतिहास आहे,” असे ब्रिटनचे उच्चायुक्त फिलिप बार्टन यांनी निवेदनात म्हटले आहे. “जागतिक पातळीवर कोविड-१९ आणि हवामान बदल ही सर्वात महत्त्वाची आव्हाने आहेत. शैक्षणिक संस्था, उद्योग जगात ,सरकार आणि राष्ट्रांना एकत्रित मिळून नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आणि चांगले भविष्य घडविण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सहकार्य करण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे."
ब्रिटीश हाय कमिशनमधील यूके-इंडिया टेक पार्टनरशिपचे प्रमुख कॅरेन मॅकलस्की म्हणाले की, कोरोना विषाणू तसेच जागतिक पातळीवरील धोका: हवामान बदल याविषयावर काम करीत असलेल्या ध्येयवादी संशोधकांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी या फंडाची स्थापना करण्यात आली आहे.
"सर्वांच्या हितासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान आत्मसात करण्यात आणि विकास करण्यात जागतिक पातळीवरील जुळे नैतृत्व म्हणून भारताबरोबर काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे," असे देखील त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांच्यात एप्रिल २०१८ मध्ये लंडन दौऱ्यादरम्यान झालेल्या बैठकीनंतर ब्रिटन आणि भारताने यूके-इंडिया टेक भागीदारी स्थापनेची घोषणा केली होती.
तंत्रज्ञान आणि व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्य वाढविण्यावर भर देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ही भेट दिली होती. भारतीय आयटी आणि बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग (बीपीओ) उद्योगांची व्यापारी संघटना नॅसकॉम आणि टेक यूके यांच्यात युके-इंडिया टेक अलायन्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार, युके-इंडिया टेक हब निर्माण करणे, यूके-इंडिया टेक क्लस्टर भागीदारी विकसित करणे आणि डिजिटल हेल्थकेअरच्या सहयोगाने भारतातील महत्वाकांक्षी आरोग्य जिल्हे कार्यक्रमात सहयोग देणे यांचा या धोरणात समावेश आहे.