हैदराबाद - सुशांत सिंह राजपूतच्या अचानक आणि रहस्यमयरित्या जाण्याने बॉलिवूडमधील अनेक चुकीच्या गोष्टींबद्दल प्रचंड वादविवाद सुरू झाले आहेत. विशेषतः आपल्या जवळच्यांचे हितसंबंध जोपासताना बाहेरच्या लोकांबद्दल असलेली असूया किंवा त्यांनी इंडस्ट्रीत स्थिरावू नये यासाठी त्यांची करण्यात येत असलेली कोंडी आणि त्यांचा आत्मविश्वास कमी व्हावा यासाठी केले जाणारे प्रयत्न याबद्दल अधिक बोलले जात आहे.
मुंबई पोलीस अद्याप सुशांतच्या मृत्यचे कारण तपासत असतानाच सुशांतची सहकारी आणि इंडस्ट्रीतली आणखी एक 'आउटसाइडर' अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूडमधील 'मुव्ही माफियां'विषयी बोलून मधमाशांच्या पोळ्यावर दगड भिरकावला आहे. कंगनाच्या मते मुंबईत मुव्ही माफियांचा ग्रुप सक्रिय असून हा ग्रुप वंशवाद किंवा जवळच्या नातलगांना इंडस्ट्रीत आणण्यासाठी कार्यरत असतो. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत तिने याविषयी सविस्तर भाष्य करत नेपोटीझमचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आणला आहे.
सुशांतच्या दुः खद मृत्यूनंतर बाहेरून येणाऱ्या प्रतिभावान लोकांना 'बॉलिवूड माफिया' इंडस्ट्रीतून बाहेर काढतात आणि 'नेपो-किड्स'ना (बालिवूडमध्ये स्थिरावलेल्या लोकांच्या मुलांना) लॉन्च करण्यासाठी किंवा काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात असा आरोप सातत्याने होत आहे. याचा अर्थ बॉलिवूड स्टार्सची मुले प्रतिभावान नाहीत असे म्हणायचे नाही. यापैकी बऱ्याचजणांनी आपली प्रतिभा सिद्ध केली असून एक कलाकार म्हणून ते नक्कीच सक्षम आहेत. परंतु, त्यांना इंडस्ट्रीत लॉन्च करताना जो सुरक्षित प्लॅटफॉर्म दिला जातो त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.
विशेष म्हणजे मुंबईतील सिनेमा विश्वाचे जे सत्य आहे तेच लुटियन्स दिल्ली आणि देशात इतर ठिकाणीदेखील आहे. नेपोटिझमने सर्वच क्षेत्रे व्यापली असून आता हा मुद्दा आपल्या जीवनशैलीच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, 'देरसे ही सही लेकिन दुरुस्त आए' याप्रमाणे नेपोटिझमच्या प्रवृत्तीला वेळीच ओळखून रोखले पाहिजे. कारण, हे लोकशाहीच्या विरुद्ध असून यामुळे सर्वांना स्पर्धा करण्याची संधी मिळत नाही.
कंगना राणौतच्या आरोपांचा मुख्य रोख असलेल्या निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने हे आरोप फेटाळून लावले असले तरी बॉलिवूडमध्ये नेपोटिझम नाही असे देखील म्हटले नाही. त्याने सार्वजनिकरित्या हे स्पष्ट केले आहे की जेव्हा एखादा निर्माता एखाद्या फिल्म स्टारचा मुलगा लॉन्च करतो तेंव्हा अर्थातच तो 'कम्फर्ट झोन'चा विचार करत असतो कारण शेवटी ती एक व्यावसायिक गोष्टदेखील आहे. “जेंव्हा एखाद्या मोठ्या चित्रपट स्टारचा मुलाचा चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार असतो त्यावेळी अर्थातच सगळ्यांचे त्याकडे लक्ष असते अशावेळी बिझनेस करण्याची संधी असते". दुसर्या शब्दांत ते म्हणतात, निर्माते जेंव्हा नेपोटीझम झोनमध्ये असतात तेव्हा त्यांना 'सुरक्षित' वाटते.
हाच मुद्दा राजकारणात देखील लागू होत नाही का? विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने पक्ष तिकिटांचे वितरण करतात त्याकडे पहिले तर लक्षात येते की 'कनेक्टेड' असणे किती महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यानंतर मागील सात दशकांहून अधिक काळ हेच घडत आले आहे. वस्तुतः नेपोटेझिमचा मुद्दा इतका अंगी भिनला आहे की ज्यांच्या आजी-आजोबांनी अनेक दशकांपूर्वी राष्ट्रीय स्तरावर एखाद्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते त्याच स्थानावरून पुढे त्यांची मुले आणि आता त्यांची नातवंडे आपला हक्क सांगत आहेत. इतकेच नाहीतर या मुलांचे आजी-आजोबा ज्या लुटियन्स दिल्लीतील घरांमध्ये राहत ती घरे देखील आपलीच असल्याच्या थाटात ते राहत असतात. ते ही गोष्ट विसरून गेले आहेत की ही घरे सार्वजनिक मालमत्ता आहेत. या सर्वांवर काडी म्हणजे जर या पूर्वजांचे दुसर्या किंवा तिसर्या पिढीतील कोणी त्या घरी वास्तव्य करत नसेल तर त्या वास्तूचे स्मारक म्हणून रूपांतर केले जावे यासाठी मागणी केली जाते.
आपल्या राष्ट्रीय राजकारणात आणि लुटियन्स दिल्लीमधील या प्रवृत्तीचे नेहरू-गांधी कुटुंब प्रवर्तक आहेत. १९५९मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आपली कन्या इंदिरा गांधी यांची इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नेमणूक करून याची सुरुवात केली. त्यानंतर जे घडले ते भारताच्या लोकांना चांगलेच ठाऊक आहे. या कुटुंबातील सदस्यांनी एक पाठोपाठ एक याप्रमाणे देशाचे पंतप्रधान म्हणून सत्ता मिळविली. ज्यामुळे आपण स्वीकारलेली प्रजासत्ताक राज्यघटनेची ओळख अधिकच कमकुवत होऊन भारतात राजेशाही असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.