मुंबई AI Development In India : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) मानवतेवर आधीच मोठा प्रभाव पडलाय. त्यामुळे सरकार आणि खाजगी क्षेत्रातील संस्था या दोघांनीही याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अमेरिका, चीन तसेच विविध युरोपीय देशांमध्ये एआय मध्ये वेगानं प्रगती होत आहे. हे देश 'एआय'शी संबंधित महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेत आहेत. युएई आणि सौदी अरेबियासारखे आखाती देशही यात सक्रियपणे सहभागी होत आहेत.
- भारताकडून प्रयत्न चालू : दुसरीकडे, भारतही डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना फळ मिळेल याची खात्री करणं महत्त्वाचंय. तसेच अधिक संसाधनंचं वाटप करणही आवश्यक आहे. यात सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. सरकारनं मार्ग मोकळा केल्यास, खासगी क्षेत्रातील संस्था आयटी क्षेत्रात मोठं यश मिळवून उत्कृष्ट कामगिरी करू शकतात.
एआयच्या क्षेत्रात विशेष प्रकल्प सुरू : रिलायन्स ग्रुप ही भारतातील खाजगी क्षेत्रातील संस्था एआय मॉडल्स तयार करण्यात सक्रियपणे गुंतलेली आहे. त्यांनी एआय ऍप्लिकेशन्स विकसित करण्यासाठी दोन एक्झाफ्लॉप्सच्या एआय संगणकीय क्षमतेसह एक कॅम्पस स्थापित केला आहे. टेक महिंद्रा आणि आयआयटी मद्रास सारख्या भारतीय संस्थांसोबतच्या सहकार्यामुळे एआयच्या क्षेत्रात विशेष प्रकल्प सुरू झाले आहेत. यामध्ये भारताच्या आर्थिक विकासात लक्षणीय वाढ करण्याची क्षमता आहे. परिणामी, उत्पन्नाची पातळी वाढते तसंच लोकांचं जीवनही सुधारते.
- AI च्या वापराबाबत भारत अजूनही प्राथमिक टप्प्यात :सिंगापूरमध्ये, AI चा वापर आर्थिक निर्देशक ओळखण्यासाठी केला जातो. तर नेदरलँड्समध्ये, कल्याणकारी कार्यक्रमांचा गैरवापर करणाऱ्यांना ओळखण्यासाठी सरकार AI चा वापर करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) बाबत भारत अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे. भारतात एआय तंत्रज्ञानाचा वापर आणि या क्षेत्रातील विकास अजूनही मर्यादित आहे.
- सरकारकडून पुरेसं समर्थन आवश्यक : AI मधील संशोधन आणि विकास (R&D) क्षेत्रात लक्षणीय प्रगती करण्यासाठी खासगी क्षेत्रातील संस्थांना पुढाकार घ्यावा लागेल. सरकारनं पुरेसं समर्थन आणि नियमन प्रदान केलं पाहिजे. भारतानं AI मध्ये अग्रेसर होण्यासाठी स्वतंत्रपणे नवीन ऍप्लिकेशन विकसित केले पाहिजेत. हे साध्य करण्यासाठी संशोधनात पुरेशी गुंतवणूक, स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करणे आणि संसाधनांचे कार्यक्षम वाटप महत्त्वाचं आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची क्षमता : AI मध्ये आगामी काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची क्षमता आहे. पुढील काही दशकांत भारताच्या आर्थिक मूल्यात ट्रिलियन डॉलर्सची भर घालण्याची क्षमता एआयमध्ये असल्याचं विश्लेषणातून दिसून आलं आहे. भारत मजबूत AI शक्ती म्हणून वेगानं उदयास येत आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या दिशेनं प्रयत्न सुरू केले आहेत.