हैदराबाद - काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून वाद सुरू होते. यावर तात्पुरते समाधान मिळाले असले, तरी सोनिया गांधींचा अंतरिम अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण असणार हा प्रश्न पुन्हा येणारच आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पत्रकार अमित अग्निहोत्री यांनी वरिष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची मुलाखत घेतली. यामध्ये मणिशंकर यांनी काँग्रेसचे नेतृत्त्व करणारी व्यक्ती ही गांधी घराण्यातीलच असावी, असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी कोणा विशिष्ट व्यक्तीचे नाव घेतले नाही. मात्र गांधी कुटुंबीय ज्या कोणाची निवड करतील, त्याला आपली पसंती राहील असे अय्यर म्हणाले.
पाहूयात या मुलाखतीतील काही महत्त्वाचे मुद्दे...
प्रश्न - काँग्रेस पक्षामध्ये वरिष्ठ विरुद्ध कनिष्ठ असा वाद आणि नेतृत्वाचा प्रश्न उफाळून आलेला दिसतोय. खरा प्रश्न काय आहे?
हा वाद नेतृत्वाबद्दल नाही. हे प्रासंगिक आहे. २३ वरिष्ठ नेत्यांनीही (त्यांनी सोनिया गांधींना नाराजीचे पत्र लिहिले) सोनिया गांधींना काँग्रेसच्या प्रश्नावर नेतृत्व बदल हा उपाय असल्याचे काहीच सुचवलेले नाही. नेतृत्व हाच मूलभूत प्रश्न असे त्यांना वाटत असेल तर अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनावेळी ते स्पर्धेत उभे राहू शकतात. जितेंद्र प्रसाद यांच्यासारखे त्यांचे होणार नाही, अशी मी आशा व्यक्त करतो. जितेंद्र प्रसाद यांना ९४ मते मिळाली होती तर सोनिया गांधींना मिळाली होती ९४०० मते.
समस्या वेगळीच आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून आणि स्वातंत्र्यानंतर पहिले २० वर्ष काँग्रेससोबत असलेले सामाजिक गट १९६७ पासून राष्ट्रीय निवडणुकीच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाले. त्यांनी स्वत:चे नशीब स्वतंत्रपणे अजमावण्याचे ठरवले. विशेष करून १९९० ला मंडल आयोगानंतर अनेक मागासवर्गीयांनी स्वत:चा वेगळा गट तयार केला. मागासवर्गीयांमध्ये यादव पुढे असल्याचे त्यांना जाणवले. बाबरी मशीद पडल्यानंतर (१९९२) खूप संभ्रम निर्माण झाला. मुस्लिमांनी काँग्रेसचा त्याग केला.
इथे नेतृत्वाकडे समस्या म्हणून पाहू नका. हा प्रश्न खूप खोलवर गेला आहे. माझ्या मते हे सर्व सामाजिक गट परत येऊनच फक्त प्रश्न सुटणार नाही, तर महत्त्वाचे म्हणजे प्रदेश किंवा जात किंवा समुदाय यांच्या आधारे तयार झालेल्या पक्षांबरोबर युती व्हायला हवी. केरळमध्ये झालेल्या आधीच्या निवडणुकीत युतीच्या सदस्यांना त्यांच्या भूमिका काय हे आधीच माहीत होते. या सर्वांनी आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवतात, पण युती सत्तेत आलीच तर त्यांच्याकडे कुठले खाते येईल, हे आधीच माहीत असते.
प्रश्न - पण तुम्हाला युती का हवी? या प्रादेशिक पक्षांना काँग्रेसच्या छत्रछायेखाली काम करायचे आहे का?
भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी युती हा एकमेव व्यवहार्य मार्ग आहे. स्थानिक पक्षांनी काँग्रेससोबत मिळून काम करावे. आम्ही थोडे नमते घेतले तरच जिंकू शकतो. आम्ही त्यांना सांगत राहिलो की तुम्ही आमच्या नेतृत्वाखाली या, तर मग ते मान्य होणार नाही. ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील ते युतीचे नेतृत्व करतील असा समजूतदारपणा ठेवावा लागेल. किंवा त्या वेळी जो स्वीकारार्ह फाॅर्म्युला असेल तो. आम्ही युतीचे नेतृत्व बाजूला ठेवून युती होऊ शकते, याची खात्री करू शकतो. मी म्हणतोय, आता पंतप्रधान पदाबद्दल काही विचारू नका. ते आपल्याकडे आले तर ठीकच. पण आता पंतप्रधान कोण होणार यावर भांडायची ही वेळ नाही. मला वाटते २०२४मध्ये भाजपला हरवण्यासाठी केरळ टाइप अखिल भारतीय संयुक्त आघाडी करण्याची गरज आहे.
प्रश्न - सलग दोन राष्ट्रीय निवडणुकांमध्ये पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेते पद मिळवण्यासाठी १० टक्केही (५४) जागाही जिंकता आल्या नाहीत. काय म्हणाल यावर?
अर्थातच, हे मोठे आव्हान आहे. आम्ही मागे राहिलो, असे अनेक वेळा झाले आहे. आधीच्या अनुभवानुसार आमच्याकडे नेतृत्व आले तर आम्ही ते स्वीकारायला हवे. माझ्या स्वत:च्या राज्यात तामिळनाडूमध्ये १९६७ पासून आम्ही सत्तेत नाही आणि पुढची ६०० वर्षे तरी आम्ही तिथे नसू. पण तामिळनाडूमध्ये असे कुठलेच गाव नसेल जे काँग्रेसला पाठिंबा देणार नाहीत. यामुळेच द्रमुक आणि एआयएडीएमके यांच्यात आम्ही संतुलन साधू शकलो आणि आम्ही तगलो. मी १९९१ मध्ये जेव्हा संसदेत गेलो तेव्हा एआयएडीएमकेबरोबर असलेल्या आमच्या युतीने तामिळनाडूत ३९ संसदीय जागा जिंकल्या. संसदीय राजकारणात अशीच लवचिकता असते. आपण कुठे आहोत, हे आपल्याला कळले पाहिजे आणि सामाजिक गट परत येतील अशी आशा मी करतो.