रोम (इटली): कोवीड -१९च्या संसर्गजन्य रोगामुळे जगातील बरीचं लोकं उपासमारीच्या खाईत लोटली जाऊ शकतात, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख सचिव अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांनी सोमवारी दिला.
“द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड -२०२०” चा अहवाल प्रकाशित करताना गुटेरेस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे हा इशारा दिला. यामध्ये त्यांनी म्हटले की, २०१९ मध्ये जगभरात जवळपास ६९० दशलक्ष लोकांना उपासमारीचा सामना करावा लागला आहे. हा आकडा २०१८ च्या तुलनेत तब्बल १० दशलक्षाने अधिक आहे.
“यावर्षीच्या अन्न सुरक्षा आणि पोषण आहाराच्या जागतिक अहवालाच्या माध्यमातून हा गंभीर इशारा देण्यात आला. जगातील बर्याच भागांत उपासमारीची तीव्रता वाढली असल्याचेही यामध्ये नमूद केले आहे. तसेच ही तीव्रता आणखी वाढत जाऊ शकते,” अशी भीतीही गुटरेस यांनी व्हिडिओ संदेशामध्ये व्यक्त केली.
संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जगात उपासमारीचा आकडा हळू हळू वाढतच चालला आहे. त्यामुळे शाश्वत विकास लक्ष्य (एसडीजी) च्या अनुषंगाने ‘२०३० पर्यंत उपासमारी संपवण्याचे उद्दीष्ट’ साध्य करणे सध्या कठीण वाटत आहे.
“२०३० मध्ये एसडीजीची उद्दीष्ठे साध्य करण्याच्या बाबतीत आम्ही रस्ता भटकलो आहोत. त्याचबरोबर ‘एसडीजी २’ च्या अनुषंगाने आम्हाला आमच्या कार्यशैलीत बदल करणे आवश्यक आहे,” असे संघटनेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मॅक्सिमो टोरेरो (Maximo Torero) यांनी सांगितले.
“जर आपण आपले काम अशाच पद्धतीने चालू ठेवले, तर २०३० पर्यंत जगामध्ये जवळपास ८४० दशलक्ष लोकं कुपोषित असतील,” असेही टोरेरो म्हणाले.