नवी दिल्ली- कोरोनाच्या काळात नववर्षाचे स्वागत करताना व्हॉट्सअप कॉलिंगचा विक्रम झाला आहे. व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला १.४ अब्ज कॉल आणि व्हिडिओ कॉल केल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.
कोरोनाच्या काळात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी मित्र व कुटुंबांना कॉल केले आहेत. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक जास्त आहे. कोरोनाच्या काळात सामाजिक अंतर ठेवत संपर्क करण्यासाठी २०२० मध्ये व्हिडिओ कॉलिंगचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी वापरकर्त्यांनी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. नववर्षापूर्वी फेसबुकमध्ये संदेश पाठविणे, फोटो अपलोड करणे याचे प्रचंड प्रमाण वाढल्याचे फेसबुकचे तंत्रज्ञान कार्यक्रम व्यवस्थापक कैटलिन बॅनफोर्ड यांनी सांगितले.