सोलापूर -एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या व दुचाकी चोऱ्या वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचत दोघा चोरट्यास चोरीचे सोने विक्री करताना रंगेहात पकडले. त्याकडून 1 लाख 97 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. बसन्ना सतू शिंदे (रा. गोंधळे वस्ती, न्यू शिवाजी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) व अजय शिवाजी माने (रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर), अशी आरोपींची नावे आहेत. यांना अटक करून न्यायालयत हजर केले असता न्यायालयाने दोघा संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर यांना 14 ऑगस्टला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, बसन्ना शिंदे व अजय माने हे दोघे अक्कलकोट रोडवरून चोरलेल्या एका दुचाकीवरून सोने विक्रीसाठी सराफा बाजारात जाणार आहेत. गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी 256 गाळा या ठिकाणी सापळा लावला होता. दोघे त्या ठिकाणी आले असता पोलिसांनी त्यांना थांबण्यासाठी इशारा केला. पण, दोघे पळून जात होते. परंतु पोलिसांनी दोघा चोरट्यांना जागेवरच पकडले.