निलंगा (लातूर) : तालुक्यातील हंगरगा शिरसी येथील एका विधवा महिलेच्या घरावर आणि शेतावर गावगुंडांनी ताबा घेतल्यामुळे, या वृद्धेला बेघर व्हावे लागले आहे. सध्या ही महिला आपल्या मुलीला घेऊन गावातील हनुमान मंदिरात रहात आहे. आठ दिवसांपासून या दोघी गावातील मंदिरात राहत आहेत. यासंबंधी पोलीस तक्रार करण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र पोलिसही आपली दखल घेत नसल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.
हंगरगा येथील विधवा महिला सुमन शंकर पवार या महिलेचे पती एक वर्षापूर्वी मरण पावले होते. त्यानंतर, गावातील चार एकर जमीन आणि एक घर या महिलेच्या नावी झाले. परंतु गावातील तुकाराम माने व त्याची पत्नी लक्ष्मीबाई माने यांनी घराचे कुलूप तोडून, संपूर्ण सामान बाहेर फेकून घरावर ताबा घेतला. तर, राम साधू पवार या व्यक्तीने तिच्या चार एकर जमीनीवर ताबा घेतला. विधवा महिला आपल्या माहेरी गेली असता हा सर्व प्रकार घडला. यानंतर या दोघींना उघड्यावर रहायची पाळी आली आहे.
विधवा महिलेच्या घरावर गावगुंडांचा ताबा, आठ दिवसांपासून घेतला मंदिरात आश्रय; पोलिसांचे दुर्लक्ष.. यानंतर या महिलेने दिनांक १७ जुलै रोजी औराद शा. पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. आपली सर्व परिस्थिती सांगून, पोलिसांनी तरी न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी अर्जात केली आहे. परंतु पोलीस याची दखल घ्यायला तयार नाहीत असे या विधवा महिलेचे म्हणणे आहे.
यासंबंधी विधवा महिलेची मुलगी सुनिता बाळासाहेब शिंदे यांच्याशी ईटीव्ही भारतने फोनवर संपर्क साधला. त्या म्हणाल्या, माझ्या आईच्या घरातील सर्व सोने,पैसे आणि घरावरील पत्रेही या लोकांनी काढून घेतले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी मी आणि आई तिथे गेलो होतो, तर तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या आईला मारहाण केली व तुम्हा दोघीला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही दिली. त्यांनी माझ्या आईला हाकलून दिले आहेत. माझ्या वडिलांच्या नावे असलेली जमीन व घर आईच्या नावे आहे. त्याची सर्व कागदपत्रे आई जवळ आहेत. शासनाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती आहे.
हेही वाचा :आरोग्याच्या चौकशीसाठी गेलेल्या परिचारिकेस दोन भावांची चाबकाने मारहाण