जयपूर (राजस्थान) -टिकटॉक हे शॉर्ट व्हिडिओ अॅप भारतात प्रचंड लोकप्रिय होते. मात्र, माहिती सुरक्षेच्या कारणास्तव चिनी बनावटीच्या या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉकमधील व्हिडिओमुळे काहींच्या चेहऱ्यावर जरी हसू येत असले तरी बंदी घालण्यात आल्यानंतर सायबर गुन्हेगारांसाठी हे एक नवे शस्त्र सापडले आहे. जे युजर टिकटॉकच्या आहारी गेले आहेत, ते आता बेकायदेशीरपणे काहीही करुन अॅप डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अॅप डाऊनलोड करण्याच्या हव्यासापोटी सायबर गुन्हेगारांनी गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे.
अनेकजण बंदी घालण्यात आलेले टिकटॉक अॅप एपीके(APK.) फाईलच्या आधारे डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. एपीके ही एक अशी फाईल असते तिच्या आधारे तुम्ही एखादे अॅप डाऊनलोड करू शकता. आता प्लेस्टोअरवरून टिकटॉक गायब झाल्याने अनेकजण इंटरनेटवर हे अॅप एपीके लिंकच्या स्वरुपात शोधत आहेत. त्यामुळे हॅकर्स या अॅपच्या फेक लिंक फसवणुकीसाठी वापरत आहेत. अनेकांच्या मोबाईलमध्ये टिकटॉक डाऊनलोड करण्यासाठी ही एपीके लिंकही पाठवत आहेत. मात्र, यातून तुमची माहिती चोरीला जाण्याची शक्यता जास्त आहे. तसेच तुमची आर्थिक फसवणुकही होऊ शकते.
एपीके फाईलच्या लिंकवरून भारतात बंदी असलेले टिकटॉक अॅप तुम्हाला वापरता येईल, असे फेक मेसेज व्हॉट्सअॅपवरुन व्हायरल होत आहेत. अशा संदेशांना कृपया बळी पडू नका. फेक(बनावट) लिंकवरून कोणतेही अॅप डाऊनलोड करु नका, यासाठी 'ईटीव्ही भारत' जगजागृतीपर अभियानही राबवत आहे. यामुळे नागरिकांना सत्य काय आहे ते समजेल.
जर तुम्ही या बनावट लिंकवर क्लिक केले तर तुमच्या मोबाईलमधील सर्व फोन नंबर आणि वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांना मिळेल. टिकटॉक डाऊनलोड करण्याच्या हव्यासापोटी तुम्ही मोठ्या सायबर गुन्ह्याचे शिकार होऊ शकता. त्यामुळे अशा कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका.
फेक लिंकवरून टिकटॉक डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला असता अॅप तर डाऊनलोड होतच नाही. मात्र, इंटरनेटवर अनेक जाहिरातींची पाने (वेब पेज) उघडतात. या सर्व लिंकवरुन तुमची माहिती चोरी केली जाऊ शकते. टिकटॉकच्या आहारी गेलेल्यांना सायबर गुन्हेगारांकडून लक्ष केले जात आहे. त्यांना संदेशाद्वारे ही एपीके लिंक पाठविण्यात येत आहे.