नागपूर -कुही मार्गावर कुणाल चरडे (वय 29 वर्षे) आणि सुशील बावणे (वय 24 वर्षे) या दोन तरुणांचा खून झाल्याची घटना काल (दि. 16 नोव्हेंबर) उघडकीस आली होती. याप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ज्यामध्ये कुख्यात गुंड बाल्या उर्फ जागेश्वर संतोष दुधानकर (वय 32 वर्षे), निशांत शहकार (वय 25 वर्षे) आणि राहुल लांबट (वय 27 वर्षे) या आरोपींचा समावेश आहे. या दुहेरी खून प्रकरणामागे टोळीयुद्ध असल्याचे देखील उघड झाले आहे. त्यामुळे पुढील काळात या विषयावरून आणखी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काल (सोमवारी) सकाळी कुहीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोघांना धारदार शस्त्राने मारल्याचे समोर आले होते. कुणाल ठाकरे आणि सुशील बावणे, अशी मृतांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी हत्येच्या कारणांचा शोध सुरू केला होता. मात्र, ज्या घटनास्थळी हे दोन्ही मृतदेह आढळून आले आहेत. त्या ठिकाणी भांडणाची, झटापटीची कोणतीही खुणा नसल्याने दोघांची इतरत्र हत्या करून पाचगावजवळ आणून फेकल्याचा अंदाज बांधून पोलिसांनी तपास सुरू केला होता.
आरोपींनी दिली कबुली
दोन्ही मृत्यू हे नागपूरच्या एका टोळीशी संबंधित असल्याने पोलिसांनी प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांबाबत चौकशी सुरू केली. त्यावेळी आरोपी बाल्या उर्फ जागेश्वर संतोष दुधानकर सोबत दोन्ही मृतांचा रात्री वाद झाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी बाल्यासह निशांत शहकार आणि राहुल लांबट या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीत आरोपींनी कुणाल चरडे आणि सुशील बावणे या दोघांचा खून केल्याचं कबूल केले आहे.